पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींची निवडणूक जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिलीच मोठी राजकीय परीक्षा
अजित पवार, शरद पवार, संजय जगताप यांची प्रतिष्ठा पणाला
उरुळी फुरसुंगी, मंचर, माळेगाव येथे पहिल्यांदाच निवडणुका
सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषद ३ नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहेत. यामध्ये फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेसह,मंचर,माळेगाव या नगरपंचायतची प्रथमच निवडणूक होत आहे. या निवडणुकीतून नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी थेट अध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील १४ पैकी बारामती, लोणावळा,चाकण,आळंदी आणि राजगुरुनगर या पाच ठिकाणी प्रत्येकी एक प्रभागात तीन सदस्य पद्धतीने निवडणुका होतील, तर उर्वरित नऊ ठिकाणी दोन सदस्य प्रभाग त्या पद्धतीने निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा मधील ३४७ प्रभाग संख्या असून तीन नगरपंचायतीची प्रभाग संख्या ५१ आहे . १४ नगर परिषदांसाठी पाच लाख ७९ हजार १९९ मतदार आणि तीन नगरपंचायतीसाठी ५५ हजार ७४१ मतदार असणार आहेत. जिल्ह्यात दोन्ही निवडणूकीकांसाठी सहा लाख ३४ हजार ९४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बारामती , लोणावळा , तळेगाव, दौंड, चाकण, शिरूर, इंदापूर, सासवड, जेजुरी, भोर, आळंदी, जुन्नर, राजगुरुनगर, इंदापूर
वडगाव मावळ, मंचर, माळेगाव, उरुळी फुरसुंगी
या नगरपरिषदा आणि नगरपालिकामध्ये राजकीय परस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रथमच होत असल्याने निवडणुककडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
बारामती नगरपालिकेला 39 नगरसेवक ही संख्या होती ती आता 2025 ला 41 झाली असून नगराध्यक्ष स्वतंत्र आहे.
पूर्वी 39 + 1 = 40 आता 41 +1= 42
यापूर्वी 35 अजित पवार गटाची चार अपक्ष नगरसेवक यापूर्वी नगरपरिषदेवर होते तर नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा ओबीसी प्रवर्गातून होता.आता 2025 ला बारामती नगरपरिषद आरक्षण हे सर्वसाधारण घोषित झाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या द्वितीय चिरंजीव जय पवार यांच्या नावाची चर्चा असली तरी अजित पवार यांनी त्याला नकार दिला आहे.त्यामुएल आता कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर शरदचंद्र पवार पक्षाकडून व इतरही पक्षांकडून निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बारामती नगर परिषदेमध्ये अजित पवार विरोधात शरद पवार अशीच लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे बारामती कडे सर्वांचे लक्ष लागले.
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत नव्याने निर्माण झाली आहे. याठिकाणी ओबीसी महिला नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.त्यामुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात भाजपकडून रंजन तावरे पॅनल उभा करण्याची शक्यता आहे त्यामुळे माळेगाव नगरपंचायतीमध्ये अजित पवार विरोधात तावरे अशी लढत होण्याची शक्यता आहे. माळेगाव नगरपंचायत पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने या ठिकाणी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागेल या ठिकाणची सदस्य संख्या 17 आहे तर नगराध्यक्ष एक अशी आहे.
दौंड नगरपरिषदेसाठी यापूर्वी नगरसेवकांची संख्या 24 होती आता नवीन रचनेनुसार ती 26 झाली आहे.पूर्वीच्या असणाऱ्या 24 नगरसेवकांमध्ये नागरी हित समितीचे 09 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा 10 जागा होत्या.उर्वरित 14 जागांपैकी शिवसेनेचे 2 नगरसेवक इतर 12 जागा राष्ट्रवादी गटाकडे होत्या. मात्र आता दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्याने या ठिकाणी निवडणूक कशी होते हे पहावं लागणार आहे.यापूर्वी दौंड नगर परिषदेला नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला आरक्षित होते.आता 2025 ला दौंड नगरपरिषदेला ओबीसी महिला प्रवर्ग आरक्षित झाला आहे.दौंड मध्ये नागरिक हित संरक्षण समिती प्रमुख प्रेमसुख कटारिया यांना भाजपाचे आमदार राहुल कुल यांचा पाठिंबा असतो.यावेळी तो राहणार असून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष स्वप्निल शहा यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला असून या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी गट तसेच शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याचे चित्र आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषद आजी माजी मंत्री यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे राज्याची कृषिमंत्री दत्तामामा भरणे विरोधात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील लढत होईल. इंदापूरनगर परिषदेसाठी यापूर्वी 17 जागा नगरसेवक साठी होत्या.एक जागा नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून होती. अश्या एकूण 18 जागा होत्या.नवीन रचनेनुसार इंदापूर नगर परिषदेच्या 20 जागा नगरसेवकासाठी असून एक जागा स्वतंत्र नगराध्यक्षसाठी आहे.अशा 21 जागा आहेत.यापूर्वी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षित होते. आता 2025 ला इंदापूर नगर परिषदेसाठी सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित झाला आहे.यापूर्वी इंदापूर नगर परिषदेवर काँग्रेसचा महिला नगराध्यक्ष होता. तत्कालीन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील 2017 साली काँग्रेस पक्षात होते त्यानंतरच्या 2019 च्या विधानसभेला ते भारतीय जनता पक्षात गेले 2024 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पत्नी अनुराधा गारटकर आणि काँग्रेसच्या अंकिता मुकुंद शहा यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे जरी स्वतः उमेदवार नसले तरी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहराचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे जरी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी त्यांची भूमिका महत्त्वाची मानले जाते तर दुसरीकडे शहा यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात खेचण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रयत्नशील आहेत.भाजपात गेलेले प्रवीण माने,मोहोळचे माजी आमदार यशवंत माने हे देखील नगर परिषदेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत.मात्र इंदापूर ची खरी लढाई दोन आजी-माजी मंत्रात होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सासवड नगर परिषदेमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे विरोधात माजी आमदार संजय जगताप यांच्यात होईल. माजी आमदार संजय जगताप यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सासवड नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. तर राज्यात युतीत असलेले जगताप आणि शिवतारे सासवडमध्ये काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे..सासवड नगरपरिषदेला यापूर्वी 19 नगरसेवक होते तर नगराध्यक्ष जनतेमधून होता अशी 20 संख्या होती.आता 2025 नुसार 22 नगरसेवक संख्या झाली असून 1 नगराध्यक्ष जनतेतून आहे. पूर्वीच्या असणाऱ्या 19 जागेवर 15 नगरसेवक हे जनमत विकास आघाडीचे होते नगराध्यक्षही जनमत विकास आघाडीचा होता.तर 2 नगरसेवक शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीचे होते.यापूर्वी सासवड नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पद एस सी प्रवर्गासाठी आरक्षित होते.तर आता 2025 ला खुला प्रवर्ग आरक्षित झाले आहे.दरम्यान पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप पूर्वी काँग्रेस आहे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष होते. ते सध्या भारतीय जनता पक्षात आहेत.. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे,जालिंदर कामठे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते हे देखील याच तालुक्यातील असल्याने पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे.
जेजुरी नगरपरिषदेला यापूर्वी 17 नगरसेवक होते तर 1 नगराध्यक्ष जनतेतून होता अशा 18 जागा होत्या. तर आता नवीन रचनेनुसार जेजुरी नगरपरिषदेला 20 नगरसेवक आणि स्वतंत्र नगराध्यक्ष अशा 21 जागा झाल्या आहेत.यापूर्वी जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिला आरक्षित होते. तर आता 2025 मध्ये जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यापूर्वी जेजुरी नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती.माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपात प्रवेश केल्याने या ठिकाणच राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे दोन्ही नेते जेजुरी नगरपरिषद निवडणूक कसे लढतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेजुरी नगरपरिषद कोणाकडे जाते हे पाहावं लागणार.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषद निवडणूक मावळचे आमदार सुनील शेळके विरोधात भाजप अशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुती समोरासमोर असणार आहे. लोणावळ्यामध्ये महाविकास आघाडीची काय भूमिका आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोणावळा नगर परिषदेमध्ये 27 जागा नगरसेवकाच्या आहेत.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता. त्यामुळे विद्यमान मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.गेल्या. निवडणूकित पक्षीय बालबाल भाजपचे 9,काँग्रेस 6,शिवसेना 6,आरपीआय 1,अपक्ष 6 नगराध्यक्ष भाजपचा असे होते.मावळ आमदार सुनील शेळके यांची ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादीला खाते उघडण्यासाठी आमदारांचा कस लागणार आहे.
मावळ मधील वडगाव नगरपंचायत माजी मंत्री बाळा भेगडे विरोधात आमदार सुनील शेळके समोरासमोर येण्याची शक्यता आहे. वडगाव नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांची संख्या 17 इतकी आहे. गेल्या वेळीस राष्ट्रवादी 7,भाजप 7 ,अपक्ष 2 ,मनसे 1 अपक्षांचा नगराध्यक्ष होता त्यांनी नंतर अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे यावेळेस वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच लढत होण्याची शक्यता आहे.
तळेगाव नगरपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं मात्र या ठिकाणी महायुती एकत्रित लढणार आहे त्यामुळे या ठिकाणची लढत महायुती विरोधात महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे एकत्रित निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे या ठिकाणी या दोघांची एक हाती सत्ता येईल असं वर्तवले जाते. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक रिंगणात येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तळेगाव नगरपरिषदेमध्ये एकूण नगरसेवक संख्या 27 आहे.गेल्या वेळी भाजप 14, शहर विकास सुधारणा समिती 6,जनसेवा विकास समिती 6 नगराध्यक्ष भाजप असे चित्र होतें.
भाजप मधून आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्यामुळे सर्व ठिकाणी आपली सत्ता आणण्यासाठी आमदार यांचा कस लागणार आहे.दरम्यान आमदार सुनील शेळके निवडून आल्यानंतर सर्व मावळ हे राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच सुनील शेळके यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. यावेळेस बाळा भेगडे आणि सुनील शेळके महायुती सरकारमध्ये असल्याने दोघेही एकत्रित निवडणूक लढत आहेत.
पुणे जिल्ह्यातील भोर नगरपरिषदेचा गड राखण्याचे थोपटे समोर आव्हान तर नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीही रिंगणात सध्या राज्यातील राजकीय समीकरणे वेगळे असली तरी भोर मध्ये पुन्हा एकदा थोपटे विरुद्ध पवार असाच सामना रंगणार आहे.. लोकसभेचे तीन वेळेचा अपवाद वगळता मागील पाच दशके भोर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते आमदारकीपर्यंत निवडणूक थोपटे विरुद्ध पवार अशीच झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता नव्याने भोर नगरपरिष देमध्ये 20 जागा आहेत.मागच्या निवडणूकित 18 होत्या.मागच्या निवडणुकीत सर्व जागांवर काँग्रेसचे संग्राम थोपटे यांचे उमेदवार निवडून आले होते.आता 20 आणि एक. नगराध्यक्ष उमेदवार अशी निवडणूक असणार आहे.आता संग्राम थोपटे भाजपमध्ये गेले आहेत.आणि सध्या भाजपची ताकत नगरपालिकेमध्ये जास्त आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी पराभव केला. या प्रभावानंतर थोपटे धोपटे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. राज्यात माहिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप जरी एकत्र असले तरी भोरमध्ये मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात संग्राम थोपटे असं सामना रंगणार आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपालिका नगरसेवक संख्या अगोदर 18 जागा होत्या आत्ता नव्याने 21 जागा झाल्या आहेत एक नगराध्यक्ष असे असणार आहे.आळंदीत भाजपाची ताकद आहे या अगोदर भाजपाचा नगराध्यक्ष होता. या ठिकाणी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदे गट आहे. यावेळेस हे तिन्ही पक्ष महायुतीत असल्याने आळंदीमध्ये निवडणूक आहे पक्षांनी घेतलेली नाही.एकूणच या ठिकाणी अजुन कुठेही युती आघाडी चर्चा नाही.सगळे पक्ष स्वबळाची तयारी करत आहे त्यामुळं आळंदीमध्ये महायुतीत ती बिघाडी होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची भूमिका आळंदी बाबत महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर नगर परिषद मध्ये सध्या एकूण १७ नगरसेवक आहेत यामध्ये शिवसेना ५,राष्ट्रवादी कॉग्रेस -८ कॉग्रेस १,भाजप +आपला माणूस आपली आघाडी -३ आणि एक नगराध्यक्ष अस आहे. यावेळेस ही निवडणूक शिवसेना शिंदे गट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अशी होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात माजी आमदार अतुल बेनके या निवडणुकीत रिंगणात आहे. शिवजन्म असलेल्या जुन्नर नगरपरिषदेकडे सर्वांचे लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर महाविकास आघाडी जुन्नर नगरपरिषद निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार आणि माजी आमदार यामध्ये निवडणूक कोणाकडे जाते ही पहावी लागणार आहे.
चाकण नगर परिषदेमध्ये एकूण २३ नगरसेवक आहेत.यामध्ये भाजप १,राष्ट्रवादी कॉग्रेस-७,शिवसेना ९ ,अपक्ष ६ अशी पक्षीय स्थितीत आहे. चाकण नगर परिषदेमध्ये नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले अतुल देशमुख आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांची प्रतिष्ठापनाला लागणार आहे. महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना होण्याची शक्यता.
शिरूर नगर परिषदेत 21 जागा आहेत एक नगराध्यक्ष असेल.शिरूर शहर विकास आघाडी सह नगराध्यक्ष 17,भाजप 2,अपक्ष 2 अशी पक्षीय स्थिती आहे. शिरूर नगरपरिषद आमदार माऊली कटके विरोधात माजी आमदार अशोक पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असणार आहे. विधानसभा निवडणुकीत माऊली कटके पराभव केला होता त्यानंतर आता या निवडणुका होत आहेत त्यामुळे शिरूर नगर परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजगुरुनगर नगर परिषदेसाठी 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. एक नगराध्यक्ष अशा एकोणीस जागा असणार.गेल्या वेळेस भाजप 10,राष्ट्रवादी 6,शिवसेना 2 पशु पक्ष स्थिती होती. राजगुरुनगर नगरपरिषदेसाठी आमदार बाबाजी काळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि अतुल देशमुख यांच्यात लढत असेल.. महाविकास आघाडीकडून शिरूर नगर परिषदेत उमेदवार उभा करून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाची सत्ता येणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
पुणे शहरापासून वेगळी झालेली दोन गावे एकत्रित करत उरुळी फुरसुंगी नगरपंचायत झाली आहे. पूर्वी ग्रामपंचायत होती नव्याने नगरपंचायत झाले आहे. पहिल्यांदाच होत असलेल्या उरुळी फुरसुंगी देवाची या नगरपंचायत डीप मध्ये 32 नगरसेवक पदासाठी निवडणूक होणार आहे एक नगराध्यक्ष अशी निवडणुक होणार. पहिल्यांदाच होत असलेल्या उरुळी फुरसुंगी नगर पंचायत निवडणुकीमध्ये लढत चुरशीची होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्थानिक आमदार विजय शिवतारे शिवसेना शिंदे गट, नुकतेच काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार संजय जगताप हे तिघही प्रसंगी नगरपंचायत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. स्थानिक आघाडी युतीबाबत असून कुठल्याही चर्चा नाही. मात्र उरुळी फुरसुंगी नगरपंचायत पुणे शहराला लागून असल्यामुळे या नगरपंचायती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पूर्वी फुरसुंगी नगरपंचायत निवडणूक दुरंगी किंवा तिरंगी होण्याची शक्यता आहे.
मंचर पुर्वी ग्रामपंचायत होती आता नव्यानेच नगरपंचायत झाली आहे. नगरसेवक पदासाठी आणि एका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील मंचर नगरपंचायत आहे. मंचर नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ही अनेक जणांनी मोर्चे बंद सुरू केली आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना यांचा आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीत निसटता विषय मिळवल्यानंतर वळसे पाटील मंचर नगरपंचायत साठी कशाप्रकारे मोर्चे बांधणी करतात हे पहावं लागणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.