बडनेरामध्ये भर लग्नात नवरदेवावर चाकूने हल्ला
हल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद
नवरदेव गंभीर जखमी
पोलीस तपास सुरु केला आहे
अमरावतीच्या बडनेरामध्ये धक्कदायक घटना घडली आहे. भर लग्नाच्या मंडपात नवरदेव बोहल्यावर चढण्याआधी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. धक्कदायक म्हणजे हा हल्ला पाहून नववधू जागीच कोसळली. या हल्ल्यात नवरदेव जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुजलराम समुद्रे याचा विधीवत लग्न समारंभ सुरु होता. या दरम्यान सुजलराम हा बोहल्यावर चढणार इतक्यात दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ साम टीव्ही च्या हाती लागले आहेत. सुजलरामवर झालेला हल्ला पाहून त्याची होणारी बायको भर मंडपात चक्कर येऊन जागीच कोसळली.
हल्लेखोरांनी हल्ला करून घटनास्थळावरुन पळ काढला. त्यांना पकडण्यासाठी नवरदेवाच्या वडिलांनी त्यांच्या मागे धाव घेतली आणि त्यांना पकडायचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला.आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेल्याचा संपूर्ण व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद झाला.
या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार जखमी सुजलराम समुद्रे हा तिलक नगर परिसरातील रहिवासी आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या आरोपीचा शोध आता बडनेरा पोलीस घेत असून यापूर्वी देखील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही आरोपींनी धाब्यावर महिलेस मारहाण केली होती. त्यामुळे बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? असा प्रश्न निर्माण होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.