

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या दाम्पत्यासह त्यांच्या ९ वर्षीय मुलाचा मृत्यू
तिघेही इमारतीच्या ३६ व्या मजल्यावरून खाली पडले
घटना २७ मे रोजी घडली असून ब्रिटिश पोलिसांकडून तपास सुरू
मुलगा गंभीर आजाराने त्रस्त असल्याने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
ब्रिटनची राजधानी लंडनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाचे दाम्पत्य आणि त्यांच्या ९ वर्षीय मुलाचा इमारतीच्या ३६ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी घडली होती. पण मंगळवारी ब्रिटिश मीडियाकडून ही बातमी समोर आली. ही सामूहिक आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण मृतकांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.
राकेश पै (४७ वर्षे), त्यांची पत्नी आदिती पराळकर (४६ वर्षे) आणि मुलगा सिड पै पराळकर (९ वर्षे) अशी या तिन्ही मृतांची नावं आहेत. २७ मे रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एलिफंट अँड कॅसलमधील चर्चयार्ड येथे इमारतीवरून ते तिघे खाली पडले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
राकेश पै हे पत्नी मुलासह ४५ मजली इमारत हायपॉइंट टॉवर ब्लॉकच्या ३६ व्या मजल्यावरील बालनीमधून खाली पडले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली. या दाम्पत्यानी इमारतीवरून उडी मारून सामूहिक आत्महत्या केली. त्यांचा मुलगा गंभीर आजाराशी झुंज देत होता. डॉक्टरांनी मुलगा बरा होण्याची शक्यता कमी होत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पण त्यांच्या कुटुंबीयांनी हे खोटं असल्याचे सांगितले.
ब्रिटिश लेबर पार्टीचे खासदार नील कॉइल यांनी ही दु:खद घटना असल्याचे सांगितले. काही स्थानिकांनी ही घटना पाहिली. त्यांनी सांगितले की, या दाम्पत्याचे बाळ ब्रिटनमध्ये जन्मले होते आणि अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त होते. पोलिसांच्या मते, बाळाच्या आरोग्याच्या समस्या हे या घटनेमागील एक कारण असू शकते. राकेश पै आणि अदिती पार्लेकर २००० च्या दशकात मुंबईहून लंडनला आले आणि तिथे त्यांनी कामाला सुरूवात केली.
राकेश पै हे आर्थिक सल्लागार होते तर अदिती बांधकाम क्षेत्रात वरिष्ठ पदावर होत्या. त्यांचा मुलगा सिडला गंभीर आरोग्य समस्या होत्या. त्याला किडनीचा एक गंभीर आजारही होता ज्यामुळे तो बोलू शकत नव्हता. आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी अदितीने त्याला घरीच शिकवले आणि आपला बहुतेक वेळ त्याच्या देखभालीत घालवला. या जबाबदारीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम होत होता.
वर्षांपूर्वी, चांगल्या उपचारांच्या शोधात हे कुटुंब लंडनहून मुंबईला परतले होते. पुढील उपचारांची शक्यता मर्यादित असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर, हे कुटुंब पुन्हा यूकेला परतले. कुटुंबाच्या एका जवळच्या मित्राने 'डेली मेल'ला सांगितले की, आदितीला तिची नोकरी आणि मुलाची काळजी या दोन्ही गोष्टी सांभाळणे अत्यंत आव्हानात्मक वाटत होते, ज्यामुळे तिचा मानसिक ताण सातत्याने वाढत होता. लंडन पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपास सुरू केला. सध्या पोलिस नेमकं कारण शोधत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.