Karnataka trader kills wife and son before suicide : कर्नाटकमधील ३६ वर्षांच्या कपड्याच्या व्यापाऱ्याने पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, व्यापाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चिठ्ठीत थेट सरकारी योजनेचा उल्लेख केला आहे. आर्थिक तोट्याला त्या व्यापाऱ्याने आपल्या शेवटच्या चिठ्ठीत सरकारच्या मोफत बस योजनेला जबाबदार धरले आहे. मृतांमध्ये प्रभाकर (६५ वर्ष), त्यांची पत्नी ज्योती (५५ वर्ष) आणि त्यांचा मुलगा संतोष (२८ वर्ष) यांचा समावेश आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभाकर हे कपड्याचे व्यापारी आहेत. गेल्या काही वर्षांपासून व्यवसायात प्रभाकर यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. त्यातच त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. वाढते कर्ज, कर्जाच्या परतफेडीचा दबाव आणि व्यवसायातील होणारा तोटा, या सर्वांसाठी प्रभाकर यांनी राज्याच्या मोफत बस प्रवास योजनेला जबाबदार धरले. त्यांनी सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख केल्याचे आढळले आहे.
पोलिसांनी सांगितले की, ज्योती आणि संतोष यांचे मृतदेह राहत्या घरात आढळले, तर प्रभाकर मंगळवारी सकाळी त्यांच्या कपड्यांच्या दुकानात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. प्रभाकर यांच्या घरात सुसाईड नोट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. होम लोनच्या हप्त्याचे ओझं आणि त्याशिवाय व्यवसायात होणारे नुकसान यामुळे आर्थिक संकटात असल्याचा उल्लेख प्रभाकर यांनी सुसाईड नोटमध्ये केला होता. प्रभाकर यांनी या आर्थिक तोट्याला राज्य सरकारच्या मोफत बस योजनेला जबाबदार धरले असून, त्या सोयीमुळे व्यापारावर परिणाम झाला व उत्पन्नात घट झाली असल्याचे लिहिले आहे.
प्रभाकर यांनी आधी पत्नी आणि नंतर मुलाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर त्यांनी दुकानात जाऊन गळफास घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन्ही मृतदेहांवर पोलिसांना गळा दाबल्याचे व्रण आढळले आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रभाकर यांचा मुलगा संतोष याचे २६ एप्रिल २०२४ रोजी लग्न झाले होते. संतोषची पत्नी मेघना हिने मृतदेह पाहिल्यानंतर ही दुर्दैवी घटना उघड झाली. मेघनाने सांगितले की, सोमवारी सर्व कुटुंबाने एकत्र जेवण केले आणि त्यानंतर ते झोपायला गेले होते. प्रभाकर आणि ज्योती एका खोलीत आणि संतोष व मेघना दुसऱ्या खोलीत होते. सकाळी मेघना उठल्यानंतर ती सासूला उठवायला गेली, त्यावेळी खोलीला कुलूप लावलेले दिसले. तिने खोली उघडली तेव्हा तिला मृतदेह आढळले. तिने तात्काळ पोलिसांना कळवले. मृत्यूच्या आदल्या रात्री घरात कोणतेही भांडण किंवा असामान्य घटना घडली नसल्याचेही मेघनाने पोलिसांना सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.