

बिहारमधील मोकामामध्ये बाहुबली आमदार म्हणून ओळख असलेले अनंत सिंह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या ते मुलगी शिवांगीच्या लग्नामुळे चर्चेत आलेत. शिवांगीचं लग्न मोठ्या थाटामाटात होणार असल्याची चर्चा आहे. या लग्नाला अनेक बड्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान या लग्नातील सर्वाधिक चर्चा एका महागड्या गाडीची होतेय. अनंत सिंह त्यांच्या होणाऱ्या जावयाला तब्बल दीड ते दोन कोटी रुपये किमतीची लँड रोव्हर डिफेंडर गाडी भेट देणार असल्याची चर्चा आहे.
अनंत सिंह यांच्या होणाऱ्या जावयाचं नाव ऋषिकेश कुमार आहे. ते पाटणाजवळील बिहटामधील रहिवासी असून सध्या अमेरिकेत राहतात. ऋषिकेश यांच्यासाठी अनंत सिंह यांनी लँड रोव्हर डिफेंडर गाडी घेतल्याचं सांगितलं जातंय. ही गाडी पाटण्यात दाखल झाली असून अनंत सिंह यांच्या घराच्या बाहेर उभी असल्याची माहिती आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर रोजी अनंत सिंह यांच्या नदावां या गावात होणाऱ्या लग्नात ही गाडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
शिवांगीच्या लग्नाची तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लग्नासाठी जवळपास १० बिघा जमिनीवर मंडप आणि तंबू उभारण्यात आलेत. उत्तर प्रदेशातील मऊमधून आलेले कामगार हे काम करतायत. या शाही लग्नासाठी दुबईतून सहा मॉडेल्स येणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारही लग्नाला उपस्थित राहू शकतात.
या लग्नासाठी अनंत सिंह यांनी स्वतः मोठ्या नेत्यांना निमंत्रण देणार असल्याची माहिती आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देणार असल्याचं म्हटलंय. याशिवाय भारतासोबत पाकिस्तानमधूनही पाहुणे लग्नाला येणार असल्याचा दावा अनंत सिंह यांनी केलाय.
या लग्नातील जेवणाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. काही माध्यमांच्या माहितीनुसार, लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी १५० हून अधिक प्रकारचे पदार्थ तयार केले जाणार आहेत. तसंच जवळपास चार लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अनंत सिंह जावयाला भेट देणार असल्याची चर्चा असलेली लँड रोव्हर डिफेंडर ही देशातील महागड्या आणि आलिशान एसयूव्ही गाड्यांपैकी एक आहे. या गाडीची किंमत दीड ते दोन कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तर तिच्या सर्वात महागड्या मॉडेलची किंमत जवळपास तीन कोटी रुपयांपर्यंत जाते.
ही गाडी मजबूत आणि खडतर रस्त्यांवर सहज चालण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. गाडीचे आतील डिझाइनही अतिशय आलिशान आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स सुविधा, मोठी टचस्क्रीन आणि मनोरंजनासाठी खास इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारख्या सुविधा मिळतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.