आगरा-लखनऊ एक्सप्रेसवेवर सोमवारी सकाळी प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस राजस्थानमधील भिवाडी येथून बिहारमधील छपरा येथे जात होती. छठपूजा सणासाठी अनेक प्रवासी आपल्या गावी परतत होते. प्रवास सुरू असतानाच लखनऊमधील पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक्सप्रेसवेच्या झिरो पॉइंटजवळ हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, बसचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या खाली असलेल्या खोल दरीत जाऊन उलटली. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली. बसमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या मदतीने बसचा काही भाग तोडण्यात आला.
जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकांच्या मदतीने लोकबंधू रुग्णालय आणि केजीएमयू येथे दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी लहान मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्या माहितीनुसार, एका प्रवाशाला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी शंकर रजक (६३) यांची ओळख पटली असून ते बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी होते. दरम्यान, एक्सप्रेसवेवरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.