योगेश काशिद, साम टीव्ही
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सवर 'भावी कॅबिनेट मंत्री' असा उल्लेख करण्यात आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे बॅनर्स माजलगाव शहरासह परिसरातील प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले असून शुभेच्छुक म्हणून ऊसतोड कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा ब्रम्हगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल राधे कांबळे यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. बॅनर्सवरील मजकुरामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच राजकीय चर्चांनाही वेग आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. विरोधकांनी राजीनामा देण्याची मागणी लावून धरल्याने गेल्या वर्षी 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नैतिकतेला धरून आणि तब्येत ठीक नसल्याचे कारण त्यांनी दिले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुंडे यांचे जवळचे असल्याचा आरोप झाला होता. विशेष म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास उशीर केला अशी प्रतिक्रिया त्यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. अशातच आज मुंडे समर्थकांनी भावी कॅबिनेट मंत्री असे बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.