

आयपीएल 2026 चे विजेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र या जल्लोषादरम्यान टीमसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलीये. संघाचा स्फोटक फलंदाज टिम डेविड याच्यावर आयपीएलने एका सामन्याची बंदी घातली असून त्यामुळे तो आयपीएल 2027 मधील पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.
सोमवारी आयपीएलने याबाबत अधिकृत माहिती दिली. जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, टिम डेविड याच्यावर सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के इतका दंड ठोठावण्यात आलाय. याशिवाय त्याच्या खात्यात आणखी दोन डिमेरिट गुणांची भर पडली आहे. आचारसंहितेतील कलम 2.9 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलंय.
या नियमांनुसार सामना सुरू असताना खेळाडू, पंच, टीम अधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या दिशेने क्रिकेट साहित्य किंवा इतर वस्तू अयोग्य पद्धतीने फेकणं हा गंभीर शिस्तभंग मानला जातो.
ही घटना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या फायनल सामन्यात घडली होती. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या लढतीत पहिल्या डावातील दहाव्या ओव्हरमध्ये विकेट पडल्यावर टिम डेविडने पंच नितीन मेनन यांच्या दिशेने आइस बॅग फेकली होती. टिमच्या या कृत्याला आयपीएलने गैरवर्तन मानलं आणि त्यानंतर त्याच्यावर आता कारवाई करण्यात आलीये.
विशेष म्हणजे, टिम डेविडने स्वतःची चूक मान्य केली असून सामना रेफरी जवागळ श्रीनाथ यांनी सुनावलेली शिक्षा स्वीकारल्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणीची गरज भासलेली नाही.
अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात एका चुकीसाठी थेट एका सामन्याची बंदी का घालण्यात आली, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र यामागे डिमेरिट गुणांची सिस्टीम कारणीभूत आहे. यंदाच्या सिझनमध्ये टिम डेविडची ही तिसरी शिस्तभंगाची घटना ठरली. यापूर्वी स्पर्धेतील 20व्या सामन्यात त्याला एक डिमेरिट गुण देण्यात आला होता. त्यानंतर 54व्या सामन्यात त्याच्या खात्यात आणखी दोन गुण जमा झाले होते.
फायनल सामन्यातील या घटनेनंतर मिळालेल्या दोन पॉईंट्ससह त्याचं एकूण डिमेरिट गुण पाच झालेत. आयपीएलच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूचे पाच डिमेरिट गुण पूर्ण होताच त्याच्यावर एका सामन्याचे निलंबन लागू होतं.
या निर्णयाचा थेट परिणाम आयपीएल 2027 च्या सुरुवातीला दिसणार आहे. पुढील सिझनमध्ये टिम डेविड आरसीबीकडून खेळत राहिला तर तो टीमच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. तसंच भविष्यात तो दुसऱ्या कोणत्याही फ्रँचायझीकडून खेळला तरी त्या टीमच्या पहिल्या सामन्यात त्याला मैदानाबाहेरच बसावं लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.