Surabhi Jayashree Jagdish
आयपीएल 2026 चे विजेतेपद आरसीबीने जिंकले असलं तरी अंतिम सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचीच झाली. इतक्या कमी वयात त्याने केलेली दमदार फलंदाजी सर्वांनाच आवडली. संपूर्ण सिझनमधील खेळामुळे तो या स्पर्धेतील सर्वात मोठा स्टार ठरला.
वैभवने यंदाच्या आयपीएलमध्ये १६ सामन्यांमध्ये ७७६ रन्स केले. त्याने एक शतक झळकावलं आणि त्याची दोन शतके हुकली. त्याने दोन्ही प्लेऑफ सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली, एलिमिनेटरमध्ये ९७ आणि क्वालिफायर २ मध्ये ९६ धावा केल्या. या सिझनमध्ये त्याने एकूण ७२ षटकार मारून इतिहास रचला.
या सिझनमध्ये सर्वाधिक रन्स करून त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आणि 10 लाख रुपयांचे बक्षीसही मिळवलं. याशिवाय इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, सुपर सिक्सेस ऑफ द सीझन आणि सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन हे पुरस्कारही त्याने जिंकले.
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा किताबही त्यालाच मिळाला, ज्यासाठी त्याला ट्रॉफीसह 15 लाख रुपये देण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेत वैभवने तब्बल 72 षटकार मारत आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली. अनेक गोलंदाज त्याच्या तुफानी फटकेबाजीसमोर हतबल झाल्याचंही पाहायला मिळालं. याच कामगिरीच्या जोरावर त्याने सुपर सिक्सेस ऑफ द सीझनचा मान पटकावला.
सामन्यानंतर रवि शास्त्री यांच्याशी बोलताना वैभवने हा क्षण आपल्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं. इतके मोठे पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. पुढच्या काळात तो आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत सुरू ठेवणार असल्याचंही तो म्हणाला.
या सिझनमध्ये दबावाच्या परिस्थितीत स्वतःला कसं सावरायचं हे शिकायला मिळाल्याचंही वैभवने सांगितलं. सामन्याची परिस्थिती आणि टीमची गरज लक्षात घेऊन खेळ करणं किती महत्त्वाचे असतं, याची जाणीव त्याला झाली.
राजस्थानच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण खूप सकारात्मक असल्याचं वैभवने सांगितलंय.
टीममधील सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक नेहमी पाठिंबा देतात, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो असं तो म्हणाला.