

भाजप पंजाबमध्ये २०२७ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार
भाजपने अकाली दलासोबतची युती तोडली
पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली
पंजाबमध्ये भाजप सर्व ११७ विधानसभा जागांवर उमेदवार देणार
पंजाबमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने एकला चलोचा नारा देत मित्र पक्षासोबत युती तोडली. अकाली दलासोबतच्या युतीबद्दलच्या अटकळांना पूर्णविराम देत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजप पंजाबची निवडणूक स्वबळावर लढेल. त्यांनी पुढे असेही सांगितले की, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष सर्व ११७ विधानसभा जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करेल. त्यामुळे अकाली दलासोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मंगळवारी हॉटेल ले बॅरन येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर केवल सिंग ढिल्लन यांनी पत्रकार परिषद घेत भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. केवल सिंग ढिल्लन म्हणाले की, पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार असून पंजाबमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने सक्रियपणे काम करत आहेत.
ढिल्लन यांनी पुढे असेही सांगितले की, 'पंजाबमधील सध्याची परिस्थिती चांगली नाही. राज्यावरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत चालला आहे. विकासकामे अपेक्षेप्रमाणे होत नाहीत आणि लोकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता आहे. पंजाबच्या जनतेला आता आम आदमी पार्टीचे सरकार बदलायचे आहे. पंजाबमधील जनता भाजपकडे एक पर्याय म्हणून पाहत आहेत.'
तसंच, 'केंद्रातील मोदी सरकारने देशात विकासाची नवी दिशा निर्माण केली आहे आणि परदेशात भारताची प्रतिष्ठा वाढत चालली आहे. पंजाबच्या जनतेलाही २०२७ मध्ये भाजपला संधी मिळावी असे वाटत आहे. पंजाबमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते खूप मेहनत घेत आहेत.' पंजाब विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्यामुळे आता पंजाबमधील राजकीय समिकरणं आणखी बदलण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.