

बिहारच्या राजकारणात अचानक मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राप्रमाणे आता बिहारच्या राजकारणातही नेत्यांचे इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू झाल्याचे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे विश्वासू, निष्ठावान नेते आणि पक्षाचे माजी प्रवक्ता मृ्त्यूंजय तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लालूप्रसाद यांना हा मोठा झटका मानला जात आहे.
बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. लालूप्रसाद यादव यांचे निष्ठावान समर्थक नेते मानले जाणारे मृत्यूंजय तिवारी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आपली नवी राजकीय इनिंग सुरू केली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिवारींनी पाटण्यातील हनुमान मंदिरात पूजा केली.
भाजपमध्ये प्रवेश करताना मृत्यूंजय यांनी तेजस्वी यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच पक्षाकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीवरही भाष्य केले. मृत्यूंजय यांनी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यावर पक्षाकडे केले जाणारे सततचे दुर्लक्ष आणि नेतेमंडळींचा सतत अपमान केल्याचा आरोप केला आहे.
२०१४ मध्ये आरजेडीच्या कठीण काळात लालूप्रसाद यादव यांनी मृत्यूंजय यांच्यावर पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली होती. पक्षाच्या पडत्या काळात राष्ट्रीय प्रवक्ते आणि मीडिया प्रभारी म्हणून त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आणि पक्षाची विचारसरणी देखील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम समर्पक भावनेने केले होते. याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली. भाजपमध्ये प्रवेश करताना मृत्यूंजय यांनी आरजेडी आणि पक्षनेतृत्वावर टीकाही केली.