Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं

BMC News: मुंबई महानगर पालिकेतील भाजपचा अंतर्गत वाढ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महापौरांनी ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं
BMC Mayor Ritu TawadeSaam Tv
Published On
  • मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस

  • महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवडकर यांच्यात मतभेद

  • ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर भाजपची बैठक

  • मुंबई महापालिकेतील भाजप अंतर्गत वादाची वरिष्ठांकडून दखल

  • रितू तावडे यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

गिरीश कांबळे, मुंबई

मुंबई महापालिकेत अनेक वर्षांनंतर भाजपच्या हातात सत्ता आल्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस समोर येताना दिसत आहे. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यातील कथित मतभेद आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीपर्यंत पोहोचले आहेत. या वादावर पडदा टाकण्यासाठी भाजपने आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

शिक्षण समितीवरील एका शिफारशीवरून महापौर रितू तावडे वादाच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. बुडीत क्लासचालकाची शिक्षण समितीवर शिफारस केल्याच्या आरोपानंतर या प्रकरणाला राजकीय रंग आला. त्यानंतर तावडे यांनी पक्षातील काही व्यक्तींकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत ‘झारीतील शुक्राचार्य’ असा उल्लेख केला होता. महापौरांनी शिक्षण समितीला दिलेले पत्र समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळालं. या पत्रातील मजकूर आणि महापौरांनी केलेले वक्तव्य पाहता त्यांचा रोख शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्याकडेच असल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात आहे.

महापौर-शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये ‘कोल्ड वॉर’?

रितू तावडे आणि राजेश्री शिरवडकर यांच्यात सुरुवातीपासूनच मतभेद असल्याची चर्चा आहे. सार्वजनिक पातळीवर दोन्ही बाजूंकडून थेट आरोप-प्रत्यारोप टाळले जात असले, तरी महापालिकेतील निर्णयप्रक्रिया आणि समित्यांच्या कामकाजावरून दोघांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात आहे. आता शिक्षण समितीशी संबंधित पत्र बाहेर आल्याने हा कथित संघर्ष अधिक उघड झाला आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधावा लागत असल्याचे चित्र आहे.

वाद मिटवण्यासाठी भाजपची बैठक -

या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपकडून आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर आणि सभागृह नेते गणेश खणकर यांना बोलावण्यात आलं. बैठकीत महापालिकेतील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. विशेषतः शिक्षण समितीच्या प्रकरणावरून निर्माण झालेला वाद कसा सोडवायचा, याबाबत वरिष्ठ नेते भूमिका घेऊ शकतात.

Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं
Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू

सत्तेत आल्यानंतर पहिलीच मोठी अंतर्गत परीक्षा -

मुंबई महापालिकेत अनेक वर्षांनंतर भाजपला सत्ता मिळाली आहे. महापौरपदासह महत्त्वाची समितीपदेही भाजपकडे आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद असल्याची चर्चा सुरू होणे हे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. महापौर विविध मुद्द्यांवरून वादात येत असल्याने काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. वरिष्ठ नेते आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे असल्याचे समजते.

Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं
Sunil Prabhu On BMC | पालिका ऑडिटवरून ठाकरे गट आक्रमक, प्रभु यांचा हल्लाबोल

‘झारीतील शुक्राचार्य’ कोण?

महापौर रितू तावडे यांनी यापूर्वी अनेकदा ‘झारीतील शुक्राचार्य’ असा उल्लेख केला होता. मात्र, या वक्तव्यामागे नेमका कोणाचा संदर्भ होता, यावरून भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षण समितीला दिलेले पत्र समोर आल्यानंतर या वक्तव्याचा संदर्भ राजेश्री शिरवडकर यांच्याशी जोडला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्यामुळे आजच्या बैठकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यातील मतभेद दूर करण्याबरोबरच भविष्यात महापालिकेतील निर्णयप्रक्रियेत समन्वय कसा राखायचा, यावरही वरिष्ठ नेते मार्ग काढण्याची शक्यता आहे. सत्ता मिळाल्यानंतर भाजपमध्ये सुरू झालेली ही अंतर्गत धुसफूस आजच्या बैठकीनंतर थांबणार का, की ‘कोल्ड वॉर’ आणखी तीव्र होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं
BJP Reshuffle : अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक', एकाच वेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, पाहा यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com