

मध्य प्रदेशात डॉक्टरकडून पत्नीची निर्घृण हत्या
गळा दाबल्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
अपघाताचा बनाव करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं तपासातून उघड
मध्य प्रदेशमध्ये एका डॉक्टरने अनैतिक संबंधातून बायकोची निर्घृण हत्या केली. अपघाताचा बनाव करत या डॉक्टरने बायकोला संपवलं. अपघातानंतर कारला भीषण आग लागली आणि यामध्ये बायकोचा मृत्यू झाला असल्याचे त्याने सांगितले. बायको जिवंत जळत होती आणि डॉक्टर त्याठिकाणी उभा राहून पाहत राहिला. ही घटना २० मार्चला घडली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना डॉक्टरचा खरा चेहरा समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, २० मार्चला मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील चनाटोरिया येथे ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला कारला भीषण आग लागली होती आणि या आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला हा अपघात असल्याचे पोलिसांना वाटत होते. पण नंतर तपासातून महिलेच्या डॉक्टर नवऱ्यानेच तिची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी या डॉक्टराला अटक केली असून तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, २० मार्चला मध्यरात्री २ वाजता डॉक्टर निलेश कुर्मी घरी आला. दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्यावरून बायको आणि त्याच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने बायकोचा गळा दाबला आणि ती बेशुद्ध पडली. आवाज ऐकून डॉक्टरची मुलगी उठली तेव्हा त्याने तिला तुझ्या आईची तब्येत खराब झाली असून तिला डॉक्टरकडे घेऊन जात असल्याचे सांगितले.
त्यानंतर डॉक्टरने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने कारमध्ये बायकोचा मृतदेह टाकला. त्याने कार घरापासून ५० किलोमीटर दूर चनाटोरियाजवळ नेली. त्यावेळी पहाटेचे ४ वाजले होते. निलेशने रस्त्याच्या कडेला कार उभी केली आणि बायकोच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावली. ज्यावेळी त्याने बायकोला पेटवून दिले तेव्हा ती जिवंत होती. डॉक्टर आणि त्याचे दोन मित्र कारच्या बाहेर उभे राहून तिला जिवंत जळताना पाहत राहिले. त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही.
हा अपघात वाटावा यासाठी डॉक्टरने ३ वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. आधी त्याने सासऱ्याला सीमाला हार्ट अटॅक आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पोलिसांना कारला ट्रकने धडक दिली त्यानंतर आग लागल्याचे सांगितले. त्याने पुढे असाही दावा केला की कारमधील सीएनजी टाकीचा स्फोट झाला. पण तपासादरम्यान पोलिसांना सीएनजी टाकीचा स्फोट झाला नसल्याचे कळाले त्यामुळे त्यांना डॉक्टरवरच संशय आला. त्यांनी डॉक्टरची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. डॉक्टर निलेशचे दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. त्याच्या बायकोला याची माहिती कळाली होती यावरून त्यांच्यात रोज भांडण व्हायचे. या त्रासाला कंटाळून त्याने तिची हत्या केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.