

पुण्यातील शिरूरमध्ये १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या
विहिरीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं
घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण
पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये १२ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. दहिवडीमध्ये १२ वर्षीय मुलाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. समलिंगी संबंधाला विरोधात केल्यामुळे या मुलीची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात ही धक्कादायक घटना घडली. साईराज मांजरे या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. साईराज सहावीत शिकत होता. घराजवळील विहिरीजवळ अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला.
या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. साईराजच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासादरम्यान शिक्रापूर पोलिसांनी त्याच्या भावकीतील एका तरुणाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. समलिंगी संबंधाला विरोध केल्याच्या कारणातून साईराजची हत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
१० वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका लहान मुलाची हत्या झाली होती. त्या देखील हत्या प्रकरणाच्या संबंधाबाबत चौकशी केली जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.