

पुणे पोलिसांकडून थेट मध्य प्रदेशात कारवाई करत ४ बेकायदेशीर पिस्तूल कारखाने उद्ध्वस्त.
एकूण ३६ जण ताब्यात. २१ शस्त्र जप्त.
या कारवाईसाठी १०५ पोलिसांचा ताफा मध्य प्रदेशात दाखल.
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात अनधिकृत पिस्तूल कारखान्यावर छापेमारी करत ४ कारखाने उद्ध्वस्त केले. ३६ जणांना ताब्यात घेतलं. तसेच २१ शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. पोलिस उपआयुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिस दलातील विविध विभागातील तब्बल १०५ जणांचा सहभाग असलेल्या या पथकाने आज पहाटे मध्य प्रदेश मधील बरवानी जिल्ह्यातील उमरती गावात ही धडाकेबाज कारवाई केली आहे.
गेल्या ३ आठवड्यात पुणे शहरातून २१ पिस्तुलं जप्त करण्यात आली होती. यातील सर्वाधिक ११ पिस्तुलं विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आली. तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुद्धा शहरातील इतर भागात ही कारवाई केली होती.
गेल्या ३ आठवड्यात पुणे पोलिसांची पिस्तूल जप्त कारवाई
विमानतळ पोलिस ठाणे: ११
खंडणी विरोधी पथक (१): २
खंडणी विरोधी पथक (२): ३
युनिट ३: १
काळेपडळ पोलिस ठाणे: ४
दरम्यान, पुण्यात येणारे पिस्तूल हे मध्य प्रदेश मधून येत असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. मध्य प्रदेश मधील बरवानी जिल्ह्यातील एक छोटं गाव असलेल्या या उमरती गावात पिस्तूल बनवण्याचे अनधिकृत कारखान्यातून ही हत्यारं बाहेर विक्रीसाठी पाठवली जात होती अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांना तपासातून मिळाली. या विषयाच्या खोलापर्यंत जाण्याचा ठरवल्यावर पुणे पोलिसांनी थेट असे कारखाने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेत या कारवाईसाठी पोलिस उपआयुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकं तयार केली. कारवाई सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पडावी यासाठी पोलिसांकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली.
पुणे पोलिसांचे "ऑपरेशन उमरती" ची टीम
डॉ सोमय मुंडे, पोलिस उपआयुक्त (ऑपरेशन चे नेतृत्व)
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे युनिट ६ चे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण आणि झोन ४ मधील काही अधिकारी
२० सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक
५० कर्मचारी (झोन ४ आणि गुन्हे शाखा)
१ गॅस गन सेक्शनचे पथक
१ वायरलेस आणि १ सी सी टिव्ही सर्व्हेलन्स पथक
१ शीघ्र कृती दलाचे पथक सुद्धा तैनात
गुलाबी थंडी, भली पहाट अन् पुणे पोलिसांची एन्ट्री
पुणे पोलिसांच्या टीम ने काल संध्याकाळी मध्य प्रदेशच्या दिशेने प्रवास सुरू केला. उमरती हे गाव पुण्यापासून साधारण ५०० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र दुसऱ्या राज्यातील एका गावात जाऊन कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठं धाडस दाखवलं. मध्य प्रदेश राज्यात प्रवेश केल्यानंतर पुढील आढावा घेतल्यावर आणि आदेश मिळाल्यावर पथके बरवानी जिल्ह्यात पोहचले. रात्रीच्या गडद अंधारात कोणाला ही कुठला सुगावा मिळेपर्यंत पुणे पोलिसांचे पथक उमरती गावात शिरले. गाव छोटं असल्यामुळे गावात बहुतांश जणं हे अशा अनधिकृत शस्त्र बनवण्याच्या कारखान्यात काम करतात.
या कारखान्यात काही महिलांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आहे. गावात आपल्यावर हल्ला होणार नाही आणि कुठला ही अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून पुणे पोलिसांनी बुलेट प्रूफ जॅकेट परिधान केले आणि सुरू झाली छापेमारी. ड्रोन ने पहारा दिला तसेच "टार्गेट" केलेल्या कारखान्याचे ठिकाण सुद्धा "लोकेट" केलं. पहाटेच्या गुलाबी थंडीत गाड झोपेत असलेल्या गावात कोणाला ही कुण कुण न लागू देता पुणे पोलिसांच्या पथकाने मिळून आलेल्या कारखान्यांवर छापा टाकला. छापा टाकताच त्या ठिकाणी झोपलेल्या कामगारांना काय करावं सुचलं नाही. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या काही जणांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं.
सूर्योदयापर्यंत पुणे पोलिसांच्या पथकाने गावातील ४ कारखान्यांवर छापा टाकला आणि तब्बल ३६ जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी मध्ये पिस्तूल बनवण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत १०० पेक्षा अधिक बॅरल, ५ मॅगझिन, १४ ग्रेंडिंग मशीन, २ पिस्तूल, ४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस दलातील अधिकाऱ्याने दिली. छापेमारी मध्ये पोलिसांनी बेकायदेशीर शास्त्रांचे साचे तयार करण्यासाठी आणि निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ५० भट्ट्या घटनास्थळी उद्ध्वस्त केल्या. शस्त्रांवर एम्बॉसिंग करण्यासाठीचे साहित्य सुद्धा या कारवाई मध्ये जप्त करण्यात आलं.
या संपूर्ण प्रकरणाबाबत शस्त्रसाठा आणि त्याच्या संबंधित असलेल्या सगळ्या लोकांची कसून तपासणी तसेच चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.