सामाजिक समरसता आणि एकात्मतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी विराजमान ‘समरसता श्री गणेश’ उत्सवात एक अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक उपक्रम पार पडला. सामाजिक समरसतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, देवधर यांनी या पावन दरबारातील गणेश पूजन, महाआरती आणि महाप्रसादासाठी हिंदू समाजातील देहविक्री करणाऱ्या भगिनींना सस्नेह आमंत्रित केले होते.
यावेळी उपस्थित भगिनींनी भक्तिभावाने विघ्नहर्ता बाप्पाची मंगल आरती केली व महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे, हीच खरी मानवता आणि हिंदुत्वाची मूळ शिकवण आहे. बाप्पाच्या दरबारात कोणताच भेद नसून सर्व समान आहेत, अशी भावना यावेळी सुनील देवधर यांनी व्यक्त केली. समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकाला मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.
सुनील देवधर यांनी दिल्लीत २०२१ पासून या अभिनव आणि अद्वितीय ‘समरसता श्री गणेश’ पूजेची सुरुवात केली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या सामाजिक एकात्मतेच्या विचारांना पुढे नेत, ते दरवर्षी समाजातील सर्व पंथ, धर्म आणि उपेक्षित घटकांना बाप्पाच्या पूजेसाठी आमंत्रित करतात. यावर्षी आतापर्यंत शीख समाज तसेच एनडीएमसीच्या (NDMC) स्वच्छता कर्मचारी बांधवांच्या हस्ते बाप्पाची मंगल आरती व पूजन संपन्न झाले आहे.
येत्या काही दिवसांत मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध भंते, दलित, तृतीयपंथी (किन्नर), दिव्यांग, बालगृहातील अनाथ मुले, समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेले माजी नक्षलवादी, चकमा समुदाय, ईशान्य भारतातील विविध वसतिगृहांमध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच वेद पाठशाळेतील बटू-विद्यार्थी ‘समरसता श्री गणेश’च्या दरबारात उपस्थित राहून बाप्पाची पूजा व आरती करणार आहेत. जातिभेद, पंथभेद आणि उच्च-नीचतेच्या भिंती ओलांडून संपूर्ण समाजाला एका सूत्रात बांधणारा हा उत्सव राजधानी दिल्लीत सामाजिक सौहार्दाचे एक प्रेरणादायी केंद्र ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.