बिहारमध्ये आज भाजपचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी हे शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आज जवळपास दोन दशकानंतर बिहारमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. बिहारच्या लोकभवनमध्ये नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पडणार आहे. यापूर्वीच संभाव्य मंत्रीमंडळ आणि सरकारची नवीन रणनीती देखील समजणार आहे.
नवीन मंत्रीमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण 24 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांसह 11 मंत्री, तर JDU मध्ये उपमुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. कालच सम्राट चौधरी यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्याने मुख्यमंत्रीपदाचा देखील चेहरा तेच असल्याने राजकीय सूत्रांनी सांगितले.
त्यापूर्वी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. सध्याचे मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले. त्याचबरोबर, काल संध्याकाळी बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली. नवीन सरकारच्या संभाव्य रचनेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार, २४ सदस्यीय मंत्रिमंडळ स्थापन केले जाऊ शकते, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे ११, उपमुख्यमंत्र्यांसह जेडीयूचे ९, एलजेपीचे २ (राम विलास) आणि एचएएम व आरएलएमचे प्रत्येकी १ मंत्री असतील.
भाजपच्या कोट्यातून विजय कुमार सिन्हा, मंगल पांडे, दिलीप जयस्वाल आणि श्रेयसी सिंह यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे, तर जेडीयूकडून विजेंद्र यादव, श्रवण कुमार, अशोक चौधरी आणि लेसी सिंह यांच्या नावांचाही विचार केला जात आहे.