
भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. 'आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही' अशी मोठी घोषणा बलुच नेत्यांनी केली आहे. १४ मे २०२५ रोजी बलुच प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य जाहीर केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही आणि हा निर्णय दशकांपासून चालणाऱ्या लष्करी अत्याचार, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध बलुच जनतेचा राष्ट्रीय आदेश आहे.'
मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'तुम्ही मराल, आम्ही बाहेर जाऊ. आम्ही आमची जात वाचवण्यासाठी बाहेर पडलो आहोत. या आणि आमच्यात सामील व्हा. बलुचिस्तान हा पाकिस्तान नाही आणि जग आता मूकप्रेक्षक राहू शकत नाही.' त्यांनी विशेषतः भारतातील नागरिकांना, माध्यमांना, युट्यूबर्सना बलुचांना पाकिस्तानचे लोकं असल्याचे म्हणणे थांबवण्याचे आवाहन केले.
ते या पोस्टमध्ये पुढे म्हणाले की, आम्ही पाकिस्तानी नाही, आम्ही बलुची आहोत. पाकिस्तानचे स्वतःचे लोक पंजाबी आहेत ज्यांना कधीही बॉम्बस्फोट, जबरदस्तीने बेपत्ता करणे किंवा नरसंहाराचा सामना करावा लागला नाही. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) रिकामा करावा या भारताच्या निर्णयाशी बलुचिस्तान पूर्णपणे सहमत आहे. त्यांनी ग्लोबल कम्युनिटीला पाकिस्तानवर दबाव आणण्याचे आवाहन केले जेणेकरून ते पीओकेमधून त्वरित माघार घेतील. जर पाकिस्तानने लक्ष दिले नाही तर १९७१ प्रमाणे पुन्हा एकदा शरणागती पत्करावी लागू शकते.', असा इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, 'भारत पाकिस्तानच्या सैन्याला पराभूत करण्यास सक्षम आहे आणि जर रक्तपात झाला तर त्याची जबाबदारी इस्लामाबादच्या लोभी जनरल्सवर असेल जे पीओकेमधील लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत.', तर बलुच नेत्याने भारत आणि ग्लोबल कम्युनिटीला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्यास सांगितले. त्यांनी असा आरोप केला की, 'बलुचिस्तान जबरदस्तीने आणि परदेशी शक्तींच्या संगनमताने पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले. बलुचिस्तान बऱ्याच काळापासून हिंसाचार, दडपशाही आणि मीडिया ब्लॅकआउटचा बळी ठरत आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.