
पाकिस्तानने भारताच्या सीमाभागात केलेल्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद झाला आहे. बॉर्डरवर पाकिस्तानशी लढत असताना बिहारचे सुपुत्र रामबाबू सिंह यांना वीरमरण आले. ९ मे रोजी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी पाकिस्तानला प्रत्युत्तर देत असताना बीएसएफ जवान रामबाबू गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामबाबू सिंह शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांच्या बिहारमधील गावामध्ये शोककळा पसरली आहे.
रामबाबू सिंग यांचे वडील दिवंगत रामविचार सिंग हे हरिहरपूर पंचायतीचे माजी सरपंच होते. रामबाबू सिंग यांचे ४ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्या कर्तव्यावर परतले. ९ मे रोजी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ते शहीद झाले. शहीद जवान रामबाबू यांची पत्नी झारखंडमधील धनबाद येथे राहते. रामबाबू शहीद झाल्याची माहिती त्यांच्या बायकोला आणि आईला देण्यात आली नाही. रामबाबू आजारी आहेत असेच त्यांच्या आईला आणि बायकोला सांगण्यात आले आहे.
रामबाबू सिंग यांचे लहानपाणापासून सैन्यदलामध्ये भरती होण्याचे स्वप्न होते. सैन्य दलामध्ये भरती झाल्यापासून ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. त्यांनी आतापर्यंत सीमेवर उभं राहून देशाचे संरक्षण केले. अखेर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. रामबाबू यांच्या कुटुंबीयांना ते शहीद झाल्याचे वृत्त पोलिसांकडून कळाले. रामबाबू यांचा मित्र देखील जवान आहे. तो देखील जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. त्याने रामबाबू शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या गावकऱ्यांना सांगितले.
रामबाबू सिंग शहीद झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. आज संध्याकाळपर्यंत त्यांचे पार्थिव वासिलपूर या गावी आणण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन आणि लष्कराचे अधिकारी त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील आणि राजकीय सन्मानाने अंतिम निरोप दिला जाईल. गावकऱ्यांनी सांगितले की, राम बाबू लहानपणापासूनच देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत होते आणि गावाला त्यांच्या हौतात्म्याचा अभिमान आहे. पण, इतक्या लहान वयात ते शहीद झाले हे खूप दुःखद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.