

मुंबईमध्ये मराठी आणि परप्रांतीय वाद सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावबीजेच्या दिवशी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर जोरजोरात भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. यामुळे आता मनसे आणि शिवसेना पक्ष आक्रमक झाला आहे. वडाळा, सानपाडा आणि आंबिवली रेल्वे स्थानकांवर सकाळी सकाळी भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. याचे व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. यावर आता मराठी माणसांनी संताप व्यक्त केला आहेत. अनेक मुंबईकरांनी सोशल मीडियावर हे व्हिडीओ पोस्ट करत 'हा महाराष्ट्र आहे बिहार?', असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकात भोजपुरी गाणी मोठ्या आवाजात वाजवली असल्याचा प्रकार समोर आला. येत्या रविवारी छठपूजा असून त्यानिमित्त मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकांतील सीएसएमटीसह अन्य स्थानकांत अधूनमधून भोजपुरी गाणी वाजवली जात आहेत. यामध्ये वडाळा, सानपाडा, नेरूळ, छत्रपती शिवाजी महाराज स्थानकासह इतर स्थानकाचा समावेश आहे. वडाळा येथे वाजवण्यात आलेल्ल्या गाण्यावरून ठाकरेंच्या सेनेने आक्षेप घेतला आहे. वडाळा येथील स्थानकावर वाजवण्यात आलेल्या गाण्यावरून ठाकरे सेनेच्या नगरसेवक माधुरी मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला.
मनसे नेते राजू पाटील देखील यावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट करत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये राजू पाटील यांनी लिहिले की,'आज महाराष्ट्रात दिवाळीतील भाऊ-बहीण या पवित्र नात्याचा सन्मान करणारा भाऊबीजेचा सण! मग महाराष्ट्रातील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आज भाऊबीजेच्या सणाची मराठी गाणी का ऐकू येऊ नयेत?'
तसंच, 'महाराष्ट्राच्या सण-उत्सवांना आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी छटपूजेची गाणी लावून परप्रांतीय सणांचा उत्सव साजरा करण्याची गरज काय? प्रश्न छटपूजेचा किंवा कोणत्याही समाजाच्या सणाचा विरोध करण्याचा नाही. पण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सणांना आणि मराठी संस्कृतीला योग्य तो सन्मान मिळणार की नाही? १२ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारला प्रश्न विचारला जात होता — “कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?” आज हाच प्रश्न भाजपाला विचारण्याची वेळ आली आहे.', असं राजू पाटील म्हणाले.
भाऊबीजेच्या दिवशी आंबिवली रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाण्यांचा आग्रह कशासाठी, असा सवाल उपस्थित करत मराठी प्रवाशांनी या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आंबिवली रेल्वे स्थानकावरील या प्रकारावर कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेनेही तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविला आहे. महाराष्ट्रातील स्थानकांवर स्थानिक भाषा आणि संस्कृतीला प्राधान्य मिळायला हवे, अशी भूमिका प्रवासी संघटनेकडून मांडण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.