.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलमध्ये सायंकाळी थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. बोरिवलीहून दादारला जाणारी लोकलला अचानक मोठा हादरा बसला अन् लोकल जागेवरच थांबली. या घटनेमुळे अनेकांचा जीव टांगणीला अडकला. काही जणांनी घाबरून धावत्या लोकलमधून उडी मारली. लोकलमध्ये भीती आणि प्रचंड गोंधळाची स्थिती तयार झाली होती. सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झाली नाही. पण या थराराक प्रसंगामुळे लोकलवर मोठा परिणाम झाला. (Borivali to Churchgate fast local technical glitch news,)
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर सोमवारी सायंकाळी मोठा अपघात टळल्याची घटना घडली. बोरिवलीहून सायंकाळी 4:50 वाजता सुटलेली चर्चगेट फास्ट लोकल सुमारे 5:33 वाजता दादर स्थानकावर पोहोचली असता अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता निर्माण झाली आणि काही क्षण थांबल्यानंतर ट्रेनने जोराचा झटका देत पुढे हालचाल केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे डब्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन थांबल्यानंतर अचानक पुढे सरकल्याने अनेक प्रवासी घाईघाईत उतरू लागले. काही प्रवासी आतच अडकले होते, तर काहींनी जीव धोक्यात घालून चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे. या गोंधळात काही प्रवासी डब्यांमध्येच पडल्याचेही सांगितले जात आहे. तसेच ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडण्यापासून अनेकजण थोडक्यात बचावले.
घटनेनंतर ट्रेन दादर ते प्रभादेवी दरम्यान 4 ते 5 वेळा थांबली. ट्रेनचा चालक सतत हॉर्न वाजवत सावधगिरीने ट्रेन पुढे नेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रभादेवी स्थानकावर पोहोचताच जीआरपी (Government Railway Police) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठा अपघात टळल्याने अखेर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू असून ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का याचा तपास केला जात आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासनही रेल्वेकडून दिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.