

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये दुकानांना भीषण आग लागली. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक दुकानांना आग लागली आणि एकएक करत तब्बल ६० दुकानं जळून खाक झाली. या आगीमध्ये काही घरांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या ३० पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी आहेत. शर्थिचे प्रयत्न करत तब्बल ४ तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. पण आग अजूनही धुमसत आहे.
टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही किंवा जिवीतहानी झाली नाही. टिंबर मार्केटमध्ये गेल्या ८ वर्षांतील आगीची ही तिसरी घटना आहे. या आगीत अनेक घरं देखील जळून खाक झाली. डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झाल्याचे पाहून अनेकांनी टाहो फोडला.
टिंबर मार्केट मधील विजयवल्लभ शाळेजवळील दुकानांना ही आग लागली. तसेच बाजूला असलेल्या वस्तीतील काही घरांनाही आगीची झळ पोहचली. आग लागल्याचे कळताच अनेकांनी घराबाहेर धाव घेतली त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले. या आगीची तीव्रता एवढी मोठी होती की ती आटोक्यात आणण्यासाठी सुमारे ४ तासांहून अधिक वेळ लागला.
अग्निशमन दलाकडून ३० बंब आणि १५० जवान घटनास्थळी आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने ही आग अटोक्यात आणली. तसेच जवळच्या नाल्यातील पाणीही मोटार लावून अग्निशमन दलाने बाहेर काढून आग आटोक्यात आणण्यासाठी वापरले. आगीची तीव्रता पाहून अनेक खासगी टँकरही घटनास्थळी बोलवण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
या आगीमध्ये ६० दुकाने जळाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत एकूण किती दुकाने जळाली, आग नेमकी कशामुळे लागली? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दोन गटातील युवकांच्या भांडणातून जाळपोळीच्या घटनेमुळे ही आग भडकली आहे का? याबाबत पोलीस आणि अग्निशामक दल तपास करत आहेत. या आगीमुळे घर जळून अनेक जण रस्त्यावर आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.