

हिंगोलीच्या मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग
हिंगोलीत फटाक्यांच्या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे वाहन आगीत
हिंगोली फटाक्यांच्या गोदामाला आग लागून दोघांचा मृत्यू
हिंगोली शहरातील अत्यंत गर्दीच्या आणि रहिवासी भागातील मारवाडी गल्ली (कपडा गल्ली) परिसरात असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागलीय. फटाक्यांच्या स्फोटांमुळे आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनही आगीच्या विळख्यात आले. यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
दरम्यान या दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हिंगोली शहरातील कपडा गल्ली भागात गोपाल बासटवार यांचे घर आणि फटाक्यांचे गोदाम आहे. बासटवार हे फटाक्यांचे मोठे ठोक विक्रेते आहेत. त्यांनी दिवाळीच्या तोंडावर गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा करून ठेवला होता. सोमवारी रात्री साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास अचानक या गोदामातून धुराचे लोट निघत असल्याचं दिसलं.
त्यानंतर काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले. गोदामातील फटाक्यांचे एकामागून एक मोठे स्फोट होऊ लागले. फटाक्यांच्या भीषण आवाजाने आणि धुराच्या लोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. रहिवासी भागात ही दुर्घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच आमदार संतोष बांगर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, गोदामात साठवलेल्या फटाक्यांचे सतत स्फोट होत राहिल्याने आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते.
याचदरम्यान झालेल्या एका प्रचंड स्फोटामुळे आगीच्या ज्वाला थेट अग्निशमन दलाच्या वाहनापर्यंत पोहोचल्या. यात अग्निशमन दलाची गाडीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे 2 कर्मचारी गंभीर भाजले गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.