दिवाळीच्या सणावर काळाचा घाला! धाराशिवमध्ये भीषण आगीत संपूर्ण कुटुंब जळून खाक, ६ जणांचा होरपळून मृत्यू

Dharashiv fire news today : दिवाळीच्या सणात धाराशिवच्या येडशी गावात भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घर आणि किराणा दुकानाला लागलेल्या आगीत एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले.
Dharashiv fire news today
Dharashiv fire news today
Published On: 

बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी

Dharashiv Yedshi fire Death Toll : दिवाळीच्या आनंदी वातावरणात धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. येडशी येथे मध्यरात्री एका घराला आणि किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या भयानक दुर्घटनेतून सुदैवाने एक जण बचावला आहे. दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यावर आणि येडशी गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथील एका इमारतीत खालच्या मजल्यावर किराणा दुकान असून वरच्या मजल्यावर मृत कुटुंब राहत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक इमारतीला भीषण आग लागली. खाली दुकान आणि प्लास्टिक व किराणा साहित्याचा साठा असल्याने आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट आणि प्रचंड धूर पसरल्यामुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाला बाहेर पडण्याचा मार्गच उरला नाही. धुराचे लोट घरात पसरल्यामुळे श्वास कोंडून आणि होरपळून सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Dharashiv fire news today
आगीचे तांडव! मुंबई, ठाण्यासह राज्यभरात २५ हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना; ठाण्यात रॉकेटवर बंदी, नवी मुंबईत प्रदूषण वाढले

अग्निशमन दल व गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न

मध्यरात्री आगीची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी आणि घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे आले. या दुर्घटनेत एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dharashiv fire news today
सकाळ सकाळ मुंबईकरांचे हाल, फटाक्यामुळे रेल्वे सिग्नलला आग; पश्चिम रेल्वे ३५ मिनिटे उशिराने

चार मृतदेह धाराशिव शासकीय रुग्णालयात दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. आगीत मृत पावलेल्यांपैकी चार जणांना मृत अवस्थेत धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे आणि शवविच्छेदनाचे काम सुरू आहे.

पणतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या दिव्यांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. किराणा साहित्यामुळे आग वेगाने पसरल्याची शक्यता आहे. मात्र, आगीचे नेमके आणि ठोस कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.