मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील छपारा येथील जैन मोहल्ल्यात भीषण आग
सोमवारी पहाटे ३ वाजता आग भडकली
या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये 16 वर्षीय आदित्य सोनी याचाही समावेश आहे.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. छपारा येथील महावीर वार्डमधील जैन मोहल्ल्यात एका घराला अचानक आग लागली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सराफा व्यावसायिक कुंदन सोनी यांच्या घरात सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना अचानक आग भडकल्याने घरातील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. काही वेळातच आगीने घराचा मोठा भाग आपल्या विळख्यात घेतला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. घरात एकूण 10 जण असल्याची माहिती समोर आली. बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनी सर्वांना घराबाहेर काढले. मात्र, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उर्वरित चार जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेत कुंदनलाल सोनी (75), राजकुमारी सोनी (65), ऋतू सोनी (42), स्मृती सोनी (40), सूर्या सोनी (45) आणि आदित्य सोनी (16) यांचा मृत्यू झाला. तर अमायरा सोनी (7), रितेश सोनी (45), सौरभ सोनी (43) आणि आकर्ष सोनी (14) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील सहा सदस्य गमावल्याने सोनी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घराला आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी अधिकृत कारण समोर आलेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.