बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच नवीन रेल्वे भुयारी मार्ग सुरू केला जाणार आहे. त्यासाठी नगरपालिकेनं सर्वेक्षण सुरू केलं असून बॅरेज रोडजवळील रेल्वेचा जुना भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यास खरवई ते बॅरेज रोड अशी थेट वाहतूक सुरू होईल. या भुयारी मार्गामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल. या भुयारी मार्गामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.
बदलापूर शहरात पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा एकमेव उड्डाणपूल आहे. तर उड्डाणपुलालगत आणि मॅकडी चौकाजवळ असे दोन छोटे रेल्वे भुयारी मार्ग आहेत. मात्र बदलापूर शहरात वाहनांची संख्या वाढल्यामुळे या तिनही मार्गावर प्रचंड ताण येतो. भुयारी मार्गातून केवळ छोटी वाहनेच जाऊ शकत असल्यामुळे इतर वाहनांना उड्डाणपुलावरूनच ये-जा करावी लागते. सध्या कार्मेल हायस्कूल ते वडवली तलाव आणि होप इंडिया ते बॅरेज रोड अशा दोन उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष काम सुरू होऊन ते पूर्ण होईपर्यंत 3 ते 4 वर्ष लागू होतात.
त्यामध्ये बदलापूर गाव, बॅरेज रोड, रमेशवाडी या भागातील वाहनचालकांना कर्जत हायवेवर किंवा पूर्व भागात यायचे झाल्यास मोठा वळसा घालून यावं लागतं. हीच परिस्थिती पूर्वेकडील खरवई, ज्युवेली, माणकिवली या भागातील वाहनचालकांची आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून बॅरेज रोडजवळील जुना रेल्वे भुयारी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केली. माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, बांधकाम सभापती रमेश सोळसे, स्थानिक नगरसेवक संजय गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत कुलकर्णी यांनी आज या मार्गाची पाहणी केली.
या भुयारी मार्गातून सध्या एमआयडीसीचे सांडपाणी वाहत आहे. ते पाणी दुसऱ्या भुयारी मार्गातून वळवल्यास हा जुना मार्ग दुचाकी, रिक्षा आणि छोट्या चारचाकी वाहनांसाठी सुरू करता येऊ शकतो असा विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. याबाबत लवकरच रेल्वेसोबत पत्रव्यवहार केला जाणार आहे. रेल्वेकडून मंजुरी मिळताच पावसाळ्यानंतर लवकरात लवकर याठिकाणी रस्ता बनवण्यात येईल, त्यामुळे शहरातील वाहतुकीवरचा ताण बराचसा कमी होईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केला. आता यावर रेल्वेप्रशासन नेमकी काय भूमिका घेतं? यावरच या भुयारी मार्गाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.