Smart Meter Controversy: महाराष्ट्रात लुटीचं स्मार्ट मीटर? स्मार्ट मीटरविरोधात ग्राहक रस्त्यावर

Smart Meter Controversy : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट पसरलीय. ग्राहक रस्त्यावर उतरलेत तर महावितरणचे कर्मचारीही वैतागलेत. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची लुट होत असल्याचा आरोप होतोय. नेमकं काय आहे स्मार्ट मीटरचं गौडबंगाल? राज्यभर त्याचे काय पडसाद उमटतायत ? पाहूयात या रिपोर्टमधून.
Smart Meter Controversy
Maharashtra smart meter controversy latest newssaam tv
Published On

महाराष्ट्रात स्मार्ट मीटरला ग्राहकांक़डून सातत्य़ानं विरोध होतोय! महावितरण सांगतंय हे मीटर ग्राहकांच्या फायद्याचं आहे, पण दुसरीकडे हेच मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्यांचे खिसे रिकामे व्हायला लागलेत. बिलं थेट दुप्पट-तिप्पट येत असल्याचा आरोप करत संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी जनता रस्त्यावर उतरलीय.

सांगलीत महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात थेट 'दुर्गामाता'च रस्त्यावर उतरली.जर महावितरणने ही सक्ती थांबवली नाही, तर घरोघरी जाऊन स्मार्ट मीटर फोडून टाकू",अशा इशाराच आंदोलनकांनी दिलाय. दुसरीकडे मनमाड़मध्येही ठाकरेसेनेनं महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करत. स्मार्ट मीटर लावू नका, अशी भूमिका घेतलीय.नाशिकच्याच सटाणा शहरातही नागरिकांनी महावितरणच्या मोहिमेला तीव्र विरोध करत स्मार्ट मीटर लावण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रस्त्यातच रोखलं.

Smart Meter Controversy
घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

बुलढाण्यातही परिस्थिती वेगळी नाही. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी 'ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नका' अशी भूमिका घेतलेली असताना, प्रत्यक्षात मात्र अधिकारी जबरदस्तीने मीटर लावत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यामुळे अव्वाच्या सव्वा बिलांमुळे जनता पुरती बेजार झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातही वीज ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानं आणि वीज बिलात 4 ते 5 पटींनी वाढ होत असल्यानं नागरिकांनी महावितरणविरोधात घोषणाबाजी केलीय.

Smart Meter Controversy
Fact Check : तुमच्या स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा लावलाय का? व्हायरल मेसेजमागचं सत्य आले समोर

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये तर ग्राहकांचा संतापाचा पारा कमालीचा चढलाय. सोनिवली येथील महावितरण कार्यालय गाठून ग्राहकांनी वाढीव बिलासंदर्भात अधिकाऱ्यांनाच थेट जाब विचारलाय. पण या सगळ्यात महावितरणच्या 'अति-स्मार्ट' कारभाराचा सर्वात धक्कादायक नमुना यवतमाळमध्ये समोर आलाय. एका ग्राहकाच्या घरी मीटर न लावता 5 महिन्यांपासून बिल पाठवण्याचा भोंगळ कारभार महावितरणनं केलाय.

दरम्यान राज्य़ात स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या वाढीव बिलाविरोधात ग्राहक आक्रमक झालेले असताना स्मार्ट मीटरमुळे वीजबील वाढत नसून हिटवेव्हमुळे वाढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलीय. एकीकडे सरकार 'स्मार्ट' आणि डिजिटल महाराष्ट्राच्या गप्पा मारत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात महावितरणच्या या भोंगळ आणि सक्तीच्या कारभारामुळे ग्राहकांमध्ये संताप आहे.

.संमती नसताना मीटर बसवणे, मीटर न लावताच बिलं धाडणे आणि बिलांमध्ये 4 ते 5 पटीने वाढ होणे... या प्रकारांमुळे जनतेचा संयम आता सुटत चाललाय. जर सरकारनं आणि महावितरणने या जनक्षोभाची दखल घेऊन ही सक्ती तातडीने थांबवली नाही, तर येत्या काळात 'स्मार्ट मीटर'चा हा वाद संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणला चांगलाच महागात पडणार, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com