

परभणी महापालिकेत महापौरपदासाठी १३ उमेदवार रिंगणात
उपमहापौरपदासाठी ७ उमेदवारांचे अर्ज दाखल
उबाठा सेनेकडून सर्वाधिक सहा उमेदवारांची उमेदवारी
राज्यातील सर्वच जिल्ह्यात महापालिकेत महापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई वगळता ठाण्यासह इतर महापालिकेच्या महापौरपदी निवड निश्चित करण्यात आलीय. मात्र चंद्रपूर आणि परभणी महापालिकेच्या संख्याबळामुळे सर्वांचे लक्ष या महापालिकेतील महापौराच्या निवडीकडे लागले आहे.
परभणीत महापौरपदाची निवडणूक होत असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपला दावा करत तब्बल १३ उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत. या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक असलेल्या उबाठा सेनेकडून महापौर पदासाठी तब्बल सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. कमी जागा असतानाही काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर दोन्ही जागांसाठी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे.
ठाकरे गटाकडून दिलीपसिंह ठाकूर, श्याम खोबे, सौ. प्रतिभा सरोदे, माजू लाला, सय्यद इकबाल आणि शाबुद्दीन सिद्दिकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर उपमहापौर पदासाठी श्याम खोबे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे तुलनेने कमी जागा असतानाही काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांसाठी उमेदवार देत सावध राजकीय खेळी केली आहे. काँग्रेसकडून महापौर पदासाठी भगवान वाघमारे आणि गणेश देशमुख, तर उपमहापौर पदासाठी गुलमिर खान यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.
तिकडे भाजपनेही महापौर पदासाठी डॉ. केदार खटींग, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी मीनाताई वरपुडकर आणि रितेश जैन यांना उमेदवारी दिली आहे. उपमहापौर पदासाठी भाजपकडून विश्वजित बुधवंत यांचा अर्ज दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही महापौर पदासाठी अर्जुन सामाले, तर उपमहापौर पदासाठी नाजेमा बेगम शेख अब्दुल यांनी ही अर्ज दाखल केला आहे. एकूण १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने परभणीतील महापौर निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे.
राजकीय समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये उबाठा सेनेने काँग्रेसला सहकार्य न केल्यास परभणीत काँग्रेसची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान महापालिकेच्या एकूण ६५ जागांपैकी संख्याबळ पाहता उबाठा सेना २५ आणि काँग्रेस १२, भाजप १२,अजित पवार राष्ट्रवादी ११ आणि अपक्ष ५ असे संख्याबळ आहे. ज्यात उबाठा आणि काँग्रेस एकत्र लढल्याने महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर हा काँग्रेसचा होईल असे वाटत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.