

कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
भाजपच्या रूपाराणी निकम यांचा पहिल्या महिला महापौर म्हणून अर्ज दाखल.
महापौर पदाचा कार्यकाळ किती असणार, यावर महायुतीत रस्सीखेच.
रणजीत माजगावकर,साम प्रतिनिधी
कोल्हापूर महानगर पालिकेचा महायुतीतील पहिला महापौर कोण असणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. भाजपकडून रूपाराणी संग्रामसिंह निकम यांचं नाव निश्चित झालं असतानाच आता खरा प्रश्न आहे तो महापौर पदाचा कार्यकाळ किती असणार? सव्वा वर्षांची खांडोळी की अडीच वर्षांचा स्थिर महापौर ? याच प्रश्नावर महायुतीत अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील ‘ड’ वर्गातील महत्त्वाची महापालिका असून येथे एकूण ८१ नगरसेवक आहेत. अनेक वर्ष काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या या महापालिकेत यंदा मात्र महायुतीने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपाचे २६, शिवसेनेचे १५, राष्ट्रवादीचे ४ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा १ असा एकूण ४६ नगरसेवकांचा पक्का आकडा महायुतीकडे आहे.
त्यामुळे ४१ च्या मॅजिक फिगरमुळे महापौर हा महायुतीचाच होणार, हे निश्चित आहे. त्यातच भाजपचा पहिला महिला महापौर म्हणून रूपाराणी संग्रामसिंह निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला असून चंद्रकांत पाटील यांनीही महापौर भाजपचाच असणार, हे स्पष्ट केलं आहे. मात्र कार्यकाळाच्या प्रश्नावर त्यांनी ‘निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल’ असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवलाय. महायुती म्हणून निवडणूक लढवली असली तरी पदवाटपा वरून मात्र आता चर्चा तापताना दिसतेय. खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की महापौर- उपमहापौर पदाची खांडोळी टाळण्याचा प्रयत्न असेल, पण अद्याप तिन्ही पक्षांमध्ये अंतिम चर्चा झालेली नाही.
सव्वा वर्षांनी महापौर बदलण्याची शक्यता
भाजप व शिंदे शिवसेनेचे प्रत्येकी महापौर?
स्थायी समिती, परिवहन, शिक्षण समितीवरही फॉर्म्युला
चार पक्षांत पदवाटपाची रणनीती
दरम्यान, महापौर पदाच्या खांडोळीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेलं वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरतंय. लोकांच्या अपेक्षा मोठ्या असतात. आम्हीही आधी टीका करत होती. पण सत्ता टिकवायची असेल, प्रशासन एकसंघ ठेवायचं असेल तर पदांची वाटणी अपरिहार्य असते, असं म्हणत त्यांनी राजकीय वास्तव मांडलं आहे.
तर दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी भाजपला टोला लगावत, “महापौर हा मूळ भाजपचा होणार की बाहेरून नव्याने आलेल्या भाजपचा?” असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे महापौर पदावरून राजकीय कुरघोडी आणखी वाढताना दिसतेय. महायुतीकडे सत्ता जाणं जरी स्पष्ट असलं, तरी काँग्रेसही या लढतीत माघार घेणार नाही, हे तितकंच खरं आहे. काँग्रेसचे ३४ आणि उद्धव ठाकरे गटाचा १ असे ३५ नगरसेवक निवडून आले असून अवघ्या काही जागांमुळे महापौरपद हुकलंय. म्हणूनच महापौर-उपमहापौर निवडीत काँग्रेस भाजपविरोधात पूर्ण ताकदीनिशी शड्डू ठोकणार, हे जवळपास निश्चित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.