

नवापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग
टेक्सटाईल कंपनीला लागली भीषण आग
आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक
कंपनीतील स्फोटामुळे परिसर हादरला
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीमध्ये टेक्सटाईलच्या कंपनीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग भिजवण्यासाठी गेल्या ८ तासांपासून प्रयत्न सुरूच आहेत. आग विझवण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरातमधून ३५ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहे. या आगीनंतर एमआयडीसी परिसरातील ५० कंपन्यांचे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. भीषण आगीत टेक्सटाईल कंपनीचे ८ ते १० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्री नियो फॅशन प्रायव्हेट लिमिटेड या टेक्स्टाईल कंपनीला दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. उन्हाची तीव्रता आणि वाऱ्याच्या वेगामुळे आगीने रौद्ररूप धारण केले ज्यामुळे शेजारील रिचीरीच प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीलाही आगीने कचाट्यात घेतले. या दुर्घटनेत ६२ वॉटर जेट मशीन, फिनिशिंग युनिट आणि कच्चा माल जळून खाक झाला असून कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आग विझवण्यासाठी धुळे, नंदुरबार, साक्री, पिंपळनेर आणि सोनगड येथून तब्बल ३५ अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. आठ तास उलटूनही आग धुमसतच होती. खबरदारी म्हणून परिसरातील ५० कंपन्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुदैवाने वेळेत कामगारांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. मात्र, कंपनीत झालेल्या ४ ते ५ स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, या आगीमध्ये कुणीही जखमी झाले नाही आणि सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सध्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नवापूर टेक्सटाईल हबमध्ये १३० हून अधिक कंपन्या असूनही स्वतंत्र आणि सक्षम अग्निशमन यंत्रणा नसल्याने उद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी शासनाने येथे आपत्कालीन व्यवस्था तातडीने सज्ज करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.