

अजितदादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर
सुनेत्रा पवारांकडून राष्ट्रवादीतील नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू
प्रफुल्ल पटेल आणि तटकरे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू
राष्ट्रवादी कोअर कमिटी बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष
दादांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागलेत. अशातच गटातटांनी पोखरल्यानं पक्षातील बंड शमवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी नवी रणनीती आखलीय. मात्र राष्ट्रवादीत नाराजीनाट्य का सुरु झालयं? कुरघोडीचं राजकारण थांबणार की वाढणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
गेल्या काही दिवसांत दादांच्या राष्ट्रवादीत गटातटाचं राजकारण सुरू झाल्याची जोरदार चर्चा रंगलीय. मात्र आता हे मतभेद आणि बंड शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीत तटकरे आणि पटेलांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दोघेही नाराज असल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर अनेक आमदारांसह दोघे भाजपात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगलीय. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी यावर तोडगा काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेतलाय.
सुनेत्रा पवारांनी स्वतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली असून पक्षांतर्गत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे...तसंच पक्षात निर्माण झालेली संभ्रमावस्था आणि आमदारांमधील अस्वस्थता कायमची मिटवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी याच आठवड्यात पक्षाच्या 'कोअर कमिटी'ची तातडीची बैठक बोलावली आहे. असं असलं तरी पटेल तटकरेंसोबत कुणी जाणार नसल्याचा टोला ठाकरेगटानं लगावलाय. तर पक्षात सारंकाही आलबेल असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय.
16 फेब्रुवारी 2026 -
सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणुक आयोगाला पत्र देऊन दादांच्या निधनानंतर पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्षांना म्हणजे प्रफुल पटेलांना देण्याचं आयोगाला पत्र लिहिलं.
4 एप्रिल 2026 -
त्यानंतर 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरु नये, अशी विनंती सुनेत्रा पवारांनी निवडणुक आयोगाकडे केली..
12 मे 2026 -
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत पटेल आणि तटकरेंच्या नावापुढे खासदार असा उल्लेख.त्यामुळे प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा रंगली.
13 मे 2026 -
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पटेल आणि तटकरे एकत्र गेले... मात्र परतीच्या प्रवासात तटकरे-पटेल मुख्यमंत्री फडणवीसांसोबत आल्यानं भाजप पक्षप्रवेशाची चर्चा रंगली.
16 मे 2026 -
दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना प्रवेशबंदी केल्याची चर्चा सुरू आहे. आता अजितदादांच्या निधनानंतर बदललेली राजकीय समीकरणं आणि आमदारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात सुनेत्रा पवारांना कितपत यश येणार हे कोअर कमिटीच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.