

Eknath Shinde offers MLC seat to Bacchu Kadu : महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत असून, प्रत्येक पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून एका दिग्गज नेत्याला विधान परिषदेचे तिकीट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरणार असल्याचे दिसत आहे. शिंदेंकडून 'प्रहार' जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची आज मुंबईत भेट झाली. या भेटीत शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला. यावर बच्चू कडू पुढील काही दिवसांत निर्णय घेणार आहेत. "कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ," असे कडू यांनी शिंदेंना कळवल्याचे समजते.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १२ मे रोजी या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या ९ जागांपैकी २ जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी एका जागेवर शिंदेंनी आपले जुने सहकारी बच्चू कडू यांना संधी देण्याचा विचार केला आहे. बच्चू कडू यांनी शिंदेंची ही ऑफर स्वीकारली, तर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? याकडे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा बच्चू कडू यांनी त्यांना भक्कम साथ दिली होती. मात्र त्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नव्हते, त्यामुळे ते नाराज होते. मे २०२३ मध्ये बच्चू कडू यांची राज्य दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता शिंदेंनी २०२९ ची रणनीती आखत बच्चू कडू यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.