

जळगावमध्ये लाच घेताना रंगेहात पकडलेल्या जिल्हा परिषद अधिकाऱ्याच्या घरात आणि बँक लॉकरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) मोठं घबाड सापडलंय. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी (वर्ग १) सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्याकडे तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता आढळली आहे. यामध्ये २ हजार ५२४ ग्रॅम सोने, ११ हजार ६३३ ग्रॅम चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे.
शिसोदे यांना २ नोव्हेंबर रोजी १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर त्यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेण्यात आली. या झडतीत आदर्श नगरमधील दोन घरांची किंमत अनुक्रमे ४५ लाख आणि ६५ लाख रुपये असल्याचं समोर आलं. घरातून ७ लाख ९७ हजार ९२० रुपये रोख आणि २४ लाख ३९ रुपयांच्या इतर वस्तू मिळाल्या. घरझडतीत सापडलेल्या मालमत्तेची एकूण किंमत १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपये आहे.
बँक लॉकरमध्ये ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपयांचे दागिने आढळले. यात २ हजार ५२४.१८ ग्रॅम सोन्याची बिस्किटं, पट्ट्या, चेन, पेंडंट, लॉकेट आणि बांगड्यांचा समावेश आहे. तसंच ११ हजार ६३३.७ ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि दागिने, तर १०१.०२ वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही मिळाले.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिसोदे यांना अटक करण्यात आली आहे.
शिसोदे यांच्याकडे एवढी मालमत्ता कुठून आली, याचा तपास एसीबी करणार आहे. त्यांचं वेतन, ज्ञात उत्पन्न, बँक व्यवहार, गुंतवणूक आणि मालमत्तेची तुलना केली जाणार आहे. तसंच बांधकाम विभागातील कंत्राटे आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.