

स्मार्टफोनचा वाढता वापर आणि स्वस्तात उपलब्ध होणारे हाय-स्पीड इंटरनेट यामुळे सोशल मीडियावर स्क्रोल करणं आता अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलंय. वेळ मिळाला की फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीतरी पाहत राहण्याची सवय अनेकांना लागलीये. मात्र सोशल मीडियावर घालवला जाणारा हा वेळ मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो, असा इशारा एका मोठ्या अभ्यासातून देण्यात आला आहे.
'मेंटल हेल्थ रिसर्च' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनामध्ये सोशल मीडिया वापर आणि नैराश्य म्हणजेच डिप्रेशन यांच्यातील संबंधाचा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केलंय. मार्टिन एल. ब्लॉक आणि त्यांच्या टीमने हे संशोधन केलं आहे.
या संशोधनासाठी 2014 ते 2024 या 11 वर्षांच्या कालावधीतील माहितीचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी 18 ते 70 वर्षे वयोगटातील सुमारे 1 लाख 83 हजार अमेरिकन प्रौढांचा समावेश असलेल्या 11 वेगवेगळ्या वार्षिक सर्वेक्षणाचा डेटा तपासला.
महत्त्वाची बाब म्हणजे हा अभ्यास संपूर्ण जगातील लोकांवर झालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतील नागरिकांचा डेटा वापरण्यात आलाय. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम यामुळे या अभ्यासाचे निष्कर्ष जगभरातील सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाचे मानले जातायत.
या संशोधनातील निष्कर्षानुसार, दररोज सोशल मीडिया वापरण्याचा वेळ साधारण 150 मिनिटं म्हणजेच अडीच तासांच्या आसपास पोहोचतो, तेव्हा सोशल मीडिया वापर आणि डिप्रेशनच्या लक्षणांमधील संबंध बदलताना दिसतो. सुरुवातीला हा संबंध जवळपास तटस्थ होता. मात्र सोशल मीडिया वापराचा वेळ सुमारे अडीच तासांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा डिप्रेशनच्या लक्षणांशी सकारात्मक संबंध दिसू लागला.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोशल मीडियावर दररोज घालवलेल्या वेळेत प्रत्येक अतिरिक्त एक तासाची वाढ झाली तर डिप्रेशनची लक्षणांची शक्यता सुमारे 17 टक्क्यांनी वाढल्याचं दिसलं. याचा अर्थ असा नाही की सोशल मीडिया वापरामुळेच डिप्रेशन होतं. मात्र सोशल मीडिया वापरण्याचा जास्त वेळ आणि डिप्रेशनची लक्षणं यांच्यात संबंध आढळल्याचे या संशोधनातून दिसून आलंय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीननंतर भारत हा जगातील सर्वाधिक सोशल मीडिया युजर्स असलेल्या देशांपैकी एक आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर भारतातील वापरकर्त्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. भारतामध्ये फेसबुकचे सुमारे 40 कोटी तर व्हॉट्सअॅपचे सुमारे 53.5 कोटी युजर्स असल्याचे आकडे सांगतात.
डिजिटल इंडिया रिपोर्टनुसार, भारतीयांचं एकूण इंटरनेट आणि स्क्रीन टाइम दररोज सुमारे 6 तास 45 मिनिटांपासून 6 तास 49 मिनिटांपर्यंत आहे. यातील केवळ सोशल मीडियावर खर्च होणारा वेळ सुमारे 2 तास 28 मिनिटांपासून 2 तास 44 मिनिटांपर्यंत असल्याचं नमूद करण्यात आलंय.
म्हणजेच भारतीयांचा सोशल मीडिया वापर हा या अमेरिकन अभ्यासात सांगितलेल्या 150 मिनिटांच्या म्हणजेच अडीच तासांच्या मर्यादेच्या अगदी जवळ आहे किंवा काही वेळा त्यापेक्षाही जास्त आहे.
भारतामध्ये रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलंय. 2020 मध्ये टिकटॉकवर बंदी आल्यानंतर भारतातील शॉर्ट व्हिडिओंच्या क्षेत्रात मोठा बदल झाला. त्यानंतर इन्स्टाग्राम रील्सने ही जागा भरून काढली.
आज अनेक जण तासन्तास एकामागोमाग एक रील्स पाहत राहतात. यामध्ये अनेकदा इतर लोकांचे दिसणारे 'परफेक्ट लाइफ' पाहायला मिळतं. त्यातून नकळत स्वतःच्या आयुष्याची इतरांशी तुलना होऊ शकते. अशा सततच्या तुलनेमुळे स्वतःबद्दल कमीपणाची भावना, असुरक्षितता किंवा एंग्झायटी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं गेलंय.
भारतामध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असल्या तरी त्याबद्दल मोकळेपणाने बोलण्यास अजूनही अनेकांना संकोच वाटतो. मानसिक ताण, नैराश्य किंवा इतर मानसिक समस्यांबाबत मदत घेण्यापेक्षा त्या दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती अनेकदा दिसून येते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण (NMHS 2015-16) नुसार, भारतात मानसिक आजारांसाठी उपचार मिळण्यामध्ये मोठी तफावत आहे. देशातील मानसिक आजारांसाठीचा ट्रीटमेंट गॅप 70 टक्क्यांपासून 92 टक्क्यांपर्यंत असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय. सोप्या भाषेत सांगायचे तर मानसिक आरोग्याची समस्या असलेल्या मोठ्या संख्येने लोकांपर्यंत योग्य उपचार पोहोचत नाहीत.
यामागे तज्ज्ञांची कमतरता हे देखील एक मोठे कारण आहे. भारतात प्रत्येक 1 लाख लोकांमागे केवळ 0.75 मनोचिकित्सक आहेत. त्याच वेळी जगाची सरासरी प्रत्येक 1 लाख लोकांमागे 1.7 मनोचिकित्सक इतकी आहे.
मानसिक आरोग्याच्या समस्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखल्या गेल्या नाहीत आणि त्यावर योग्य मदत घेतली नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अशा वेळी तणाव कमी करण्यासाठी किंवा मन दुसरीकडे वळवण्यासाठी सोशल मीडियाचा सतत वापर करणं काही लोकांसाठी एक सवय बनू शकते.
एकंदरीत सोशल मीडियावर किती वेळ घालवतो याकडे प्रत्येकाने लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सतत स्क्रोल करण्याची सवय लागली असेल, झोप, काम, अभ्यास किंवा रोजच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असेल किंवा स्वतःची इतरांशी तुलना करून वाईट वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यामागचे कारण समजून घेणं गरजेचं आहे.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.