

इन्फ्लूएंझा म्हणजेच फ्लू हा अनेकांना होणारा सामान्य आजार मानला जातो. मात्र H1N1 सारख्या इन्फ्लूएंझाच्या काही प्रकारांमुळे गंभीर त्रास होऊ शकतो. आधीपासून काही आजार असलेल्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. बदलते हवामान आणि संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेता H1N1 ची लक्षणं वेळीच ओळखणं आणि गरज भासल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणं महत्त्वाचं आहे.
H1N1 इन्फ्लूएंझाचा संसर्ग प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्यातून किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या थेंबांमधून होतो. सुरुवातीला H1N1 ची लक्षणं इतर विषाणूजन्य तापासारखीच दिसू शकतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात हा संसर्ग वेगळा ओळखणे अनेकदा कठीण ठरते.
H1N1 इन्फ्लूएंझामध्ये ताप, खोकला, घसा खवखवणं, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणं आणि थकवा अशी लक्षणं दिसू शकतात. काही रुग्णांना उलट्या किंवा जुलाबाचाही त्रास होऊ शकतो. योग्य काळजी आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास हा आजार बरा होतो.
लक्षणं गंभीर होत असतील, बराच वेळ टिकून राहत असतील किंवा दिवसेंदिवस वाढत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं, ताप कमी न होणं किंवा पुन्हा वाढणं, खूप जास्त अशक्तपणा जाणवणं, ओठ किंवा चेहरा निळसर पडणं त्याचप्रमाणे सतत किंवा वाढता खोकला अशी लक्षणं दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
इन्फ्लूएंझा कोणालाही होऊ शकतो. मात्र वयस्कर व्यक्ती, लहान मुलं, गर्भवती महिला आणि दमा, फुफ्फुसांचे दीर्घकाळचे आजार, मधुमेह, हार्ट अटॅक किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो.
या व्यक्तींमध्ये इन्फ्लूएंझामुळे न्यूमोनियासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच आधीपासून असलेला फुफ्फुसांचा आजार अधिक गंभीर होऊ शकतो किंवा शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या गटातील व्यक्तींनी लक्षणं दिसताच वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचे आहे.
अहमदाबादच्या नारायण हॉस्पिटलमधील सल्लागार फिजिशियन डॉ. मनीष माहेश्वरी म्हणाले, “H1N1 ची सुरुवातीची लक्षणं सामान्य विषाणूजन्य तापासारखी दिसू शकतात. त्यामुळे ताप, खोकला, अंगदुखी किंवा थकवा यांसारखी लक्षणं दिसल्यानंतर ती वाढत आहेत का किंवा गंभीर होत आहेत का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”
इन्फ्लूएंझाच्या उपचारांमध्ये कोणत्या रुग्णांना अँटीव्हायरल औषधांचा फायदा होऊ शकतो, हे ओळखणे महत्त्वाचं असतं. ज्या रुग्णांना आजारामुळे गुंतागुंत होण्याचा धोका जास्त आहे, त्यांच्यामध्ये अँटीव्हायरल औषधं आजाराच्या सुरुवातीच्या काळात दिल्यास त्यांचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो. मात्र ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.
तसंच स्वतःहून अँटिबायोटिक्स घेणं टाळणं महत्त्वाचं आहे. H1N1 हा विषाणूमुळे होणारा संसर्ग असल्याने त्यावर अँटिबायोटिक्स स्वतःहून घेणं योग्य नाही. उपचारांची गरज आहे की नाही आणि कोणते औषध घ्यावं, हे डॉक्टर रुग्णाची लक्षणं आणि स्थिती पाहून ठरवतात. त्यामुळे H1N1 ची लक्षणं दिसल्यास घाबरून न जाता त्याकडे गांभीर्याने पाहणं, पुरेशी विश्रांती घेणं आणि लक्षणं वाढत असल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.