

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Rhea Chakraborty bank account unfreeze NDPS court order : मुंबईतील विशेष एनडीपीएस (NDPS) न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या बँक खात्यांवरील गोठवलेली कारवाई हटवण्याचे आदेश दिले आहेत. एनसीबीकडून (NCB) प्रक्रियात्मक त्रुटी झाल्याचे नमूद करत न्यायालयाने हा निर्णय दिला.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर २०२० मध्ये सुरू झालेल्या तपासादरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) रिया आणि शोविक यांची बँक खाती गोठवली होती. या तपासाचा विस्तार बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील कथित अंमली पदार्थ वापरापर्यंत झाला होता.
रिया आणि शोविक यांच्या वतीने अॅडव्होकेट अयाझ खान यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, एनसीबीने एनडीपीएस कायद्यातील कलम 68F अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पाळली नाही. या कलमानुसार, मालमत्ता जप्त किंवा गोठवण्याच्या आदेशाला ३० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकरणाची मंजुरी मिळणे आवश्यक असते.
विशेष न्यायाधीश यू. सी. देशमुख यांनी निरीक्षण नोंदवताना सांगितले की, "निर्धारित मुदतीत मंजुरी न घेतल्यास असा आदेश कायदेशीरदृष्ट्या वैध राहत नाही." या प्रक्रियेत त्रुटी झाल्याबाबत एनसीबीनेही कोणताही आक्षेप घेतला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
सरकारी पक्षाने रिया चक्रवर्तीच्या कथित जबाबांचा संदर्भ देत, तिचा ड्रग्ज नेटवर्कशी संबंध असल्याचा दावा केला आणि खाती गोठवण्याच्या कारवाईचे समर्थन केले. मात्र, न्यायालयाने प्रक्रियात्मक नियमांचे उल्लंघन अधिक महत्त्वाचे मानत तिचा अर्ज मंजूर केला.
न्यायालयाने दोन्ही भावंडांची बँक खाती तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले असून, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार त्यांना खाती वापरण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीचा जप्त केलेला पासपोर्टही परत करण्याचे आदेश दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.