Pranit More FIR: ‘370 बिर्याणी’ या वादग्रस्त टिप्पणीमुळे चर्चेत आलेले स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणी प्रणित मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुग्राम येथे झालेल्या एका स्टँड-अप शोदरम्यान घडलेल्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे.
वादाची सुरुवात प्रणित मोरे याच्या शोमधील ‘क्राउड वर्क’मध्ये झाली. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमधील हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाने डेटिंगचा अनुभव सांगताना महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला. मुलीसाठी 370 किंमतीची बिर्याणी खरेदी केल्यामुळे त्याला तिने त्याच्या शारिरीक अपेक्षा पूर्ण कराव्या असे वाटत होते असे तो शोमध्ये म्हणाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करण्यात आले.
वाद अधिक वाढण्याचे कारण म्हणजे या वक्तव्यावर प्रणित मोरेने आक्षेप न घेत हसून विषय पुढे न्हेला. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी कार्यक्रमादरम्यान झालेल्या चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर प्रणित मोरे यांनी सार्वजनिकरित्या माफी मागत तो या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे त्याने सांगितले.
आता या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ (BNS) आणि ‘माहिती तंत्रज्ञान कायदा २०००’ (IT Act), BNS कलमे ७५(१)(iv), ७५(३), २९४, आणि ३५३(२) आणि IT Act कलम ६७६७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. व्ह्यूज, लाइक्स आणि सोशल मीडियावरील एंगेजमेंट वाढवून आर्थिक फायदा कमावण्यासाठीच असा आक्षेपार्ह मजकूर रेकॉर्ड आणि प्रमोट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. डिजिटल जग सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस कटिबद्ध असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने प्रणित मोरे आणि हिमांशू जांग्रा यांना समन्स बजावत २२ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हरियाणा पोलिसांकडेही या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे