Tumbadchi Manjula collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या यशाची एक एक पायरी चढत आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद २’ या चित्रपटांच्या यशानंतर आता ‘तुंबडची मंजुळा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या पाच दिवसांतच उल्लेखनीय कमाई करत प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
बॉक्स ऑफिसवर ‘तुंबडची मंजुळा’ने चौथ्या दिवशी तब्बल ७० लाख रुपयांची कमाई केली. तर पाचव्या दिवशी या चित्रपटाने ७२ लाखांची मोठी कमाई केली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी चित्रपटाने ५४ लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. त्याच्या तुलनेत पाचव्या दिवसाच्या कमाईत जवळपास ३० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चित्रपटाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रदर्शनाच्या शो संख्येतही वाढ करण्यात आली आहे.
आता पर्यंत झालेली कमाई
दिवस १ – ५४ लाख
दिवस २ – ९८ लाख
दिवस ३ – १.७३ कोटी
दिवस ४ – ७० लाख
दिवस ५ – ७२ लाख
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी राज्यभरात ३९१ शो आयोजित करण्यात आले होते. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन रविवारी शोची संख्या ५०० पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर सोमवारी ही संख्या तब्बल ६०० पर्यंत पोहोचली. वाढत्या शोमुळे चित्रपटाच्या कमाईलाही मोठी चालना मिळाल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत ‘तुंबडची मंजुळा’ने ४.६७ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन आणि ५.५१ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. चित्रपटाची पहिल्या आठवड्याच्या अखेरीस एकूण कमाई ५.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी कमाई करेल.
अहवालांनुसार, हा चित्रपट सुमारे ६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. विविध कोरगावकर दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे आणि उमेश जगताप यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. रहस्य, विनोद आणि थरार यांचा अनोखा संगम असलेली कथा प्रेक्षकांना विशेष भावत आहे. दरम्यान, ‘तुंबडची मंजुळा’ने २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या टॉप ५ यादीतही स्थान मिळवले आहे. या चित्रपटाने ३.४४ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या ‘सुपर डुपर’ला मागे टाकत पाचवे स्थान पटकावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.