पंतप्रधान नरेंद्र मोदी आजा मुंबईत दौऱ्यावर आहेत. मोदींची ठाण्यात सभा होणार आहे. यावेळी ते मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी मुंबईऐवजी ठाण्यात करणार आहेत. मोदींच्या सभेमुळे ठाण्यामध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. पीएम मोदींच्या सभेसाठी ठाण्यामध्ये वाहतूक नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
पीएम मोदींच्या सभेसाठी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी मुंबई -नाशिक महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना शहापूर येथे थांबविण्यात आले आहे. परंतु पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे याचा फटका लहान वाहनांना बसत आहे. फक्त अवजड वाहनांना ठाण्याच्या दिशेने जाऊन देऊ नये आणि त्यांना रस्त्याच्या बाजूला थांबवून ठेवावे असे असताना पोलिसांनी सकाळी ७ वाजल्यापासून मुंबईच्या दिशेने जाणारा लेन हा पूर्ण बंद केला असल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
सायंकाळी ४ वाजेपर्यंत जर या वाहनांना थांबून ठेवले तर किती लांबपर्यंत रांगा लागतील हे सांगता येणार नाही. काही वाहन चालक पोलिसांना न जुमानता उलट्या दिशेने वाहने घेऊन जात असल्याने दुसऱ्या लेनवर वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे आता मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूरजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अति महत्त्वाचे म्हटले तर पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी नाशिकवरून निघालेल्या वाहनांनाही या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागणार आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'विशेषत: पुणे आणि गोवा महामार्गावर सणासुदीच्या काळात वाहतूक अधिक असेल. पंतप्रधानांच्या दौऱ्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी ठाण्यात अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.' नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांची रूपरेषा देणारी अधिसूचना जारी केली आहे. नाशिकला जाणाऱ्या वाहनांना जेएनपीटी जंक्शन - कर्जत - मुरबाड - शहापूर - कसारा - इगतपुरी मार्गाने जावे लागेल.
गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांसाठी, पनवेलजवळील JNPT जंक्शनपासून JNPT जंक्शन - कर्जत - मुरबाड - शाहपूर - वाडा - मनोर टोल नाका असा नियुक्त मार्ग आहे. जेएनपीटी जंक्शन ते पुणे एक्स्प्रेस वे मार्गे चाकण असा अतिरिक्त पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. जिथून वाहने अहमदनगर-नाशिक महामार्गाने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतात.
पोलिस अधिकाऱ्याने पुढे असे देखील सांगितले की, 'अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही वाहनावर या निर्बंधाचा परिणाम होणार नाही. ही बंदी खासकरून नवी मुंबई ते ठाणे मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठी आहे. प्रतिबंधित मार्गांवर कोणतेही अवजड वाहन प्रवेश करणार नाही याची खात्री करण्यासाठी तेथे चेक पॉइंट असतील. खारपाडा, टी पॉइंट, रबाळे, तळोजा, महापे-शिळफाटा, न्हावा शेवा येथील चांदणी चौक, उरण, गव्हाण फाटा या मोक्याच्या ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.