Dhangar Samaj Protest: आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, नाशिक-कोल्हापूरसह राज्यभरात रास्तारोको; पाहा VIDEO

Dhangar Samaj Aggressive For Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून आंदोलनं सुरू आहेत.
Dhangar Samaj Protest: आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, नाशिक-कोल्हापूरसह राज्यभरात रास्तारोको; पाहा VIDEO
Dhangar Samaj Aggressive For ReservationSaam Tv
Published On

धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समजाकडून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नाशिक, बीड, बारामती, कोल्हापूर याठिकाणी धनगर समाजाने रास्तारोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. राज्यामध्ये धनगर समाजाचे आंदोलन कुठे-कुठे सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

बीड -

धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या या मागणीसाठी बीडच्या परळीमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे. परळी -गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर इटके कॉर्नरवर रास्ता रोको करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने धनगर समाज या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालाय. सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे. सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास महायुतीचे सरकार येऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बीड - लातूर महामार्गावर धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरल्याने जवळपास एक तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर समाजाला सरकार वारंवार फक्त आश्वासन देत असून एसटीमध्ये समावेशाच्या आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने या ठिकाणचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सरकारने यावर गांभीर्याने विचार न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे.

नाशिक -

नाशिकमध्ये धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आदिवासीमधून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे. रास्तारोको आंदोलनामुळे काही काळ पुणे -नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलनादरम्यान धनगर समाजाकडून सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापूर -

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापूरातील पुणे- बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर करणार असून धनगर समाजातील बांधव आंदोलनाच्या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे.

बारामती -

पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर समाजाला लवकर आरक्षण मिळावे या मागणीसाठी बारामती सोनगाव रस्त्यावर धनगर समाजाच्या वतीने झारगडवाडी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनामध्ये शेळ्या-मेंढ्या रस्त्यावर आणत काही काळ रास्तारोको करण्यात आला. यावेळी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तर दुसरीकडे बारामती -इंदापूर रस्त्यावर धनगर समाजाच्या वतीने काटेवाडी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पंढरपूर -

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पंढरपुरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाने आज राज्यव्यापी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पंढरपूर - कराड मार्गावर धनगर बांधवानी शेळ्या मेंढ्या घेऊन रास्तारोको आंदोलन‌ केले. सरकारने धनगड दाखले रद्द करून तात्काळ धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी हे रास्तारोको करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com