महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी पावसाची परिस्थितीचा आढावा घेतला.
नांदेड, लातूर आणि उदगीर परिसरात पूरस्थिती गंभीर आहे.
एनडीआरएफ, लष्कर आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजिवन विस्कळीत झाले आहे. याच पावासाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबईतील पाऊस आणि त्याचसोबत महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे किती नुकसान झाले आहे याची देखील माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील पावसाची परिस्थिती आणि सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ' २१ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शख्यता आहे. १५ ते १६ जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण विभागात जास्त पाऊस झाला आहे. कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कुंडलिका, जगबुडीने इशारापातळी ओलांडली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहोत.'
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे २०६ मिमी इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे २२५ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.'
तसंच, 'हसनाळ येथे ८ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे २० नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे ४० नागरिक अडकले असून ते देखील सुरक्षित आहेत. ५ नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचावकार्य करत आहेत.'
'एनडीआरएफची १ टीम, एक लष्करी पथक आणि पोलिसांची टीम समन्वयातून बचाव कार्य करत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.', असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.