योगेश काशीद
बीड : राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत आहे. तर बीड जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यातच जिल्ह्यातील साबला कवडगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली एक जीप पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. यात सहा जण अडकल्याची माहिती समोर आली आहे.
मागील तीन- चार दिवसांपासून राज्यात सर्वदूर जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी- नाल्यांना पूर आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
जीप वाहत असताना तिघांनी घेतल्या उड्या
दरम्यान साबला कवडगाव परिसरात प्रवाशांनी भरलेली जीप बाहेर काढताना वाहून गेली आहे. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरु करत लोक अडकलेल्या झाडापर्यंत दोरीच्या साहाय्याने पोहचण्यात यश मिळवले. जीपमध्ये एकूण ६ लोक प्रवास करत होते. त्यापैकी तिघांनी योग्य वेळी जीपमधून उडी घेतली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका शेवरीच्या झाडावर चढून जीव वाचवला. झाडावरून मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
जोरदार पावसामुळे बचावकार्यात अडचण
घटनास्थळी अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पोहोचले. पोलीस पथकाने तातडीने बचावकार्य सुरू करत पहाटे ३ वाजेपर्यंत प्रयत्न सुरू राहिले. मात्र मुसळधार पाऊस, जोरदार प्रवाह आणि अंधारामुळे बचावकार्यात अडचण निर्माण झाली. उर्वरित लोकांचा शोध घेण्यासाठी पोलिस व स्थानिकांनी मिळून शर्थीचे प्रयत्न केले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक सतत नदी-नाल्यांच्या पाण्याच्या वाढत्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.