नव्या वर्षात मुंबईकरांसाठी दोन नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत
मेट्रो लाईन २बी आणि ९ लवकरच सुरू होईल
यामुळे मुंबईकरांना कुठूनही कसाही प्रवास करता येणार आहे
पूर्व उपनगर आणि मीरा-भाईंदर भागातील प्रवास अधिक जलद आणि सोपा होईल
मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट आणि आरमदायी होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेमध्ये नव्या वर्षात दोन नवीन मेट्रो मार्ग येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना कुठून पण कसाही प्रवास करता येईल. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे एमएमआरडीएने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मेट्रो लाईन २ बी आणि मेट्रो लाईन ९ चा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्याची तयारी करत आहेत. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आल्यामुळे या नव्या मेट्रो लाईनचे औपचारिक उद्घाटन पुढे ढकलले जाऊ शकते आणि या मेट्रो लाईन थेट मुंबईकरांसाठी सुरू केल्या जाऊ शकतात. दोन्ही मेट्रो लाईन तांत्रिकदृष्ट्या तयार आहेत. तसंच सुरक्षा चाचण्या देखील अंतिम टप्प्यात आहेत.
मंडाले-चेंबूर ही मेट्रो लाईन सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा होईल. ज्या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे तास लागायचा तो प्रवाच काही मिनिटांचा होऊन जाईल. ५.३ किलो मीटर लांबीची ही मेट्रो लाईन पूर्व उपनगरांना चांगली कनेक्टिव्हीटी प्रदान करेल.
दहिसर ही मेट्रो लाईन संपूर्ण लाईन १३.५८ किलोमीटर लांबीची आहे. ही मेट्रो लाईन दहिसर पूर्वेला मीरा-भाईंदरचे प्रवेशद्वार असलेल्या काशीगावशी जोडेल.
यलो लाईनच्या मेट्रो २ बी च्या पहिल्या विभागात एकूण ५ एलिव्हेटेड स्टेशन असणार आहेत. या स्टेशनमध्ये मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल (गोवंडी), शिवाजी चौक (चेंबूर) आणि डायमंड गार्डन (चेंबूर) यांचा समावेश असणार आहे. हा मार्ग पूर्व उपनगरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागांना जोडेल. त्यामुळे या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
तर रेड लाईनच्या मेट्रो ९ चा पहिला टप्पा दहिसर पूर्वेपासून सुरू होईल आणि काशीगावपर्यंत जाईल. ४ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो लाईन मार्गावर चार प्रमुख स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव, ज्यामुळे मीरा-भाईंदर रहिवाशांना मुंबई मेट्रो लाईन ७ मध्ये प्रवेश करणे सोपे होईल. सध्या मेट्रो लाईन ७ गुंदवली ते दहिसर पूर्वेपर्यंत धावत आहे. मेट्रो लाईन- ९ मुळे कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल.
मेट्रो लाईन २बी आणि मेट्रो लाईन ९ मुळे मुंबईचे मेट्रो नेटवर्क आणखी मजबूत होण्यास मदत होईल. महत्वाचे म्हणजे, मेट्रो लाईन २ बी ही अंधेरीतील डीएन नगर स्टेशनवर मेट्रो लाईन १ शी जोडली जाईल. ज्यामुळे प्रवाशांसाठी एक मोठा इंटरचेंज मिळेल. तसंच ही मेट्रो लाईन कुर्ला पूर्व आणि मानखुर्द दरम्यान रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ही मेट्रो चेंबूरमधील मोनोरेलला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ती मेट्रो १ तसेच चेंबूरमधील मेट्रो २अ (दहिसर ते डीएन नगर), मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-आरे), लाईन ४ (कुर्ला पूर्व) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंडावली) यांच्याशी देखील जोडली जाईल. तर भविष्यातील ही मेट्रो विमानतळ रेल्वे आणि मेट्रो ८ ए सोबत जोडण्याचा प्लान आहे.
तर दुसरीकडे मेट्रो लाईन ९ ही सध्याच्या मेट्रो लाईन ७ चा विस्तार आहे. यामुळे मीरा-भाईंदर ते अंधेरी (पूर्व) प्रवास अधिक सोपा होईल आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली ाहे त्यामुळे कोणतेही मंत्री किंवा नेते औपचारिकपणे प्रकल्पांचे उद्घाटन करू शकणार नाहीत. पण प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन हे दोन्ही नवीन मेट्रो मार्ग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.