मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मुसळधार पाऊस.
विदर्भ आणि कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी.
पुढचे ५ दिवस पावसाचा जोर कायम.
विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन- पावसाचा खेळ सुरू आहे. आजपासून राज्यात पुन्हा पावसाने चांगला जोर धरला आहे. पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे असणार आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आज विदर्भ, कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईसह उपनगरात पहाटेपासून तुफान पाऊस पडत आहे. गोरेगाव, अंधेरी, वांद्रे याठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह उरपनगरासाठी पुढचे तीन ते चार तास महत्वाचे आहेत. ठाण्यामध्ये रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. काही सखल भागात पाणी साचण्यास देखील सुरूवात झाली आहे. सकाळपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल होत आहे. सध्या तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढचे ५ दिवस हिच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.