डोळे हा आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव आहे. अनेकदा आपण त्याच अवयवाकडे दुर्लक्ष करतो. मात्र छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्याची दृष्टी कायमची जाऊ शकते. तुमच्या डोळ्यात सतत पाणी येत असल्यास वेळीच सावध व्हा. कारण ही मधुमेहाची लक्षण आहेत. अनेकदा डोळ्यासमोर अचानक अंधारी येते. ही माइग्रेन किंवा स्ट्रोकची लक्षण आहेत. त्यामुळे डोळ्यांसमोर सतत अंधारी येत असल्यास ताबडतोब डॉक्टराकडे जा. अशीच काही लक्षणे आहेत ज्यामुळे तुम्हाला होऊ शकतात 5 गंभीर डोळ्यांचे आजार, यावर नजर टाकू या.
डोळ्यांचे 5 गंभीर आजार आणि लक्षणे
1. काचबिंदू (ग्लुकोमा)
काचबिंदू ही सर्वात गंभीर दृष्टी धोक्याची स्थिती आहे. ज्यामुळे तुमची दृष्टी कायमची जाऊ शकते. डोळ्याच्या आतील दाब वाढणे हे यामागचे प्रमुख कारण असते. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. प्रकाशातून अंधाऱ्या खोलीत प्रवेश केल्यावर वस्तू उशीरा दिसल्यास सावध व्हा, कारण हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे.
2. मोतीबिंदू
वाढत्या वयात मोतीबिंदू हा आजार होणे सामान्य आहे. मात्र मोतीबिंदूवर काही उपचार (treatment)न केल्यास तुमच्या डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. डोळ्यांच्या कॉर्नियामागे असलेली लेन्स पांढरट होऊ लागते आणि प्रकाशाची किरणे डोळ्यांच्या पडद्यापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे धुसर दिसू लागते. ही मोतीबिंदू झाल्याची लक्षणे आहेत.
3. कोरडे डोळे
कोरड्या डोळ्यांशी संबंधित कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कारण यामुळे कॉर्नियल अल्सर, डाग पडणे आणि दृष्टी कमी होऊ शकते. पुरेशी झोप न मिळणे, घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे अशा अनेक कारणांमुळे डोळे कोरडे होतात. ज्यामुळे डोळ्यांत सतत जळजळ होते आणि खाज सुटते.
4. डायबेटिक रेटिनोपॅथी
डायबेटिक रेटिनोपॅथी हा डोळ्यांच्या आजाराचा एक प्रकार आहे जो मधुमेहाशी संबधीत असून बदलत्या रक्तातील साखरेमुळे होतो. सुरुवातीला अनेक मधुमेहाच्या रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणे दिसत नाहीत. मात्र कालांतराने दृष्टी(eyesight) धूसर होणे, दृष्टी कमी होणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात. त्यावेळी सावध होत त्वरीत उपचार घ्या.
5. कंजक्टिव्हायटीस
बुबळांना स्पर्श करणाऱ्या पापण्यांच्या आतमध्ये असणाऱ्या पातळ थराला सूज किंवा जळजळ होत असल्यास तुम्हाला कंजक्टिव्हायटीस हा आजार होऊ शकतो. हा आजार प्रामुख्याने अॅलर्जीमुळे(Allergies) होतो. एखाद्या पदार्थाचा अथवा वस्तूचा कण डोळ्यांत राहिल्यास कंजक्टिव्हायटीस आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डोळ्यांना पाणी येणे, जळजळ होणे, दिसण्यास त्रास होणे अशा अनेक समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरकडे जावा.
डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.