दिवाळी २०२६ मध्ये लक्ष्मीपूजन ८ नोव्हेंबरला
माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या पूजेला दिवाळीत विशेष महत्त्व
सुख, समृद्धी आणि धनधान्याच्या प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन केले जाते
दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे. या सणाला घराबाहेर सुंदर रांगोळी काढली जाते, आकाश कंदील लावला जातो. घर दिव्यांनी उजळून निघते. तिखट-गोड फराळाची मेजवानी केली जाते. दिवाळीचे ५ दिवस जल्लोष असतो. दिवाळ लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाते. घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि शांती नांदावी, अशी प्रार्थना केली जाते. २०२६ मध्ये लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त आणि या पूजेचे धार्मिक महत्त्व, पद्धत जाणून घेऊयात.
२०२६ मध्ये लक्ष्मीपूजन रविवार ८ नोव्हेंबर २०२६ रोजी केले जाणार आहे. या दिवशी कार्तिक अमावस्या आहे. लक्ष्मीपूजनासाठी प्रदोष काळाला विशेष महत्त्व आहे. सूर्यास्तानंतरच्या या काळात माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते.
मुंबई - संध्याकाळी ६:२७ ते ८:२७
पुणे - संध्याकाळी ६:२४ ते ८:२४
नागपूर - संध्याकाळी ५:५९ ते ७:५८
नाशिक - संध्याकाळी ६:२२ ते ८:२२
छत्रपती संभाजीनगर - संध्याकाळी ६:१६ ते ८:१६
कोल्हापूर - संध्याकाळी ६:२५ ते ८:२६
हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन, वैभव, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी मानले जाते. दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येऊन भक्तांना आशीर्वाद देते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. कुटुंबातील आर्थिक भरभराटीसाठी देवीकडे प्रार्थना केली जाते. घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, अशी श्रद्धा आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वप्रथम घराची स्वच्छता करून मुख्य दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढावी. संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजेच्या जागी लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर कलश स्थापना करून सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. यासोबतच घरातील पैसे, दागिने आणि व्यापाऱ्यांनी खातेवहीची पूजा करावी. त्यानंतर लक्ष्मी आणि गणेशाची आरती करून कुटुंबाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. शेवटी सर्वांना प्रसाद वाटून लक्ष्मीपूजनाचा सोहळा साजरा करावा.
दिवाळीला दिवे लावण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. दिवा हा प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. अमावस्येच्या अंधारात घरभर दिव्यांची रोषणाई करून अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो.धार्मिक मान्यतेनुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मीचे स्वागत होते. तुपाचा दिवा देवघरात आणि तेलाच्या पणत्या घराच्या विविध भागांत लावण्याची परंपरा आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.