प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा ’ ची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरच्या ह्या खास अंदाजातील चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपट काल अर्थात ८ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. थिएटर कमी मिळूनही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं दिसत आहे..
‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९०.६९ लाख रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला असून चित्रपटाला एकट्या मुंबई शहरामध्ये, ३५.१९ लाख रुपये इतका गल्ला जमावला आहे. तर मराठवाड्यामध्ये ९.४७ लाख रुपये इतका गल्ला जमावला आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये चित्रपटाने ४६.०३ लाख रुपयांचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाला पहिल्याच दिवशी मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून निर्मात्यांसह दिग्दर्शक आणि कलाकार भारावून गेले आहेत. (Marathi Film)
विधानपरिषदेमध्ये ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटला थिएटर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले की, 'मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बोरीवलीमध्ये राहणारा मराठमोळा अभिनेता प्रसाद खांडेकर हा हास्यजत्रेचा लोकप्रिय अभिनेता आहे. ८ डिसेंबरला त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट येत आहे. चित्रपटातले काही बॉस आणि दादा लोकं या मराठी चित्रटाला थिएटर मिळवून देत नाहीयेत. प्रसाद खांडेकर हा मराठी तरूण आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ला तात्काळ थिएटर मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ही विनंती.'
प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, 'प्रसाद खांडेकर हे अतिशय गुणी कलाकार आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने त्यांनी लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. जर अशा मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल आणि थिएटर उपलब्ध करून दिले जाईल.' असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
प्रसाद खांडेकरच्या या चित्रपटाच्या माध्यमातून १६ विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘एकदा येऊन तर बघा’, या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णीसह अनेक दमदार कलाकारांनी काम केले आहे. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर असून प्रसाद खांडेकरने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट ८ डिसेंबरला रिलीज झाला. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.