

आयपीएल 2027 च्या सिझनमध्ये हार्दिक पांड्या नव्या टीमकडून खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. कारण मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या याच्या ट्रेडबाबत सध्या चर्चा सुरू आहे. आयपीएल 2026 चा सिझन संपल्यापासूनच हार्दिक दुसऱ्या टीमकडून खेळणार अशा बातम्या समोर येतायत.
पण अद्याप कोणत्याही टीमसोबत त्याचा व्यवहार निश्चित झालेला नाही. अशातच एका नव्या रिपोर्टनुसार, हार्दिकला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चर्चा सुरू आहे. या व्यवहारात पंजाब किंग्सला मुंबईला दोन खेळाडू द्यावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्पोर्ट स्टारच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलीये. आयपीएल 2027 पूर्वी हा मोठा ट्रेड ठरू शकतो. याआधी हार्दिकच्या नावाची चर्चा चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या टीमसोबत होत होती. पण आता पंजाब किंग्स हार्दिकला आपल्या टीमसोबत घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय.
या व्यवहारात पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातंय. रिकी पाँटिंग यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटचा भाग होते. त्यामुळे या चर्चेत त्यांचा अनुभव उपयोगी पडतोय.
हार्दिक पांड्याच्या ट्रेडसाठी पंजाब किंग्सकडून केवळ पैशांचा व्यवहार होणार नाही. त्याऐवजी पंजाबला आपले दोन खेळाडू मुंबई इंडियन्सला द्यावे लागणार आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि विष्णू विनोद यांच्या नावांचा समावेश आहे. अर्शदीप सिंह हा पंजाब किंग्सचा अनुभवी आणि महत्त्वाचा गोलंदाज आहे. तो बऱ्याच काळापासून या टीमकडून खेळतोय.
दुसरीकडे, विष्णू विनोद यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग होता. त्यामुळे मुंबईच्या टीममधील वातावरण आणि काम करण्याची पद्धत त्याला आधीपासून माहीत आहे. नव्या टीममध्ये जुळवून घेणं त्याच्यासाठी सोपं ठरू शकतं. त्याचप्रमाणे अर्शदीप सिंह मुंबईच्या टीममध्ये आल्यास जसप्रीत बुमराहला गोलंदाजीमध्ये चांगली साथ मिळू शकते.
स्पोर्ट स्टारच्या रिपोर्टनुसार, दोन्ही टीमच्या मॅनेजमेंटमध्ये या दोन खेळाडूंच्या बदल्यात हार्दिकला घेण्याच्या प्रस्तावावर जवळपास सहमती दर्शवलीये. आता या व्यवहाराची कागदपत्रे आयपीएल अधिकाऱ्यांकडून तपासली जाण्याची शक्यता आहे. 17 नोव्हेंबरच्या खेळाडू रिटेन्शनच्या अंतिम मुदतीपूर्वी म्हणजेच या आठवड्याच्या अखेरीस या ट्रेडची अधिकृत घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
हार्दिक पांड्या हा चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. त्यामुळे तो पंजाब किंग्सच्या टीममध्ये आल्यास मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीला ताकद मिळेल. त्याचप्रमाणे शेवटच्या ओव्हर्समध्ये रन्स करण्यासाठीही टीमला त्याचा फायदा होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.