
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठी- हिंदीच्या वादामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उडी मारली होती. या निशिकांत दुबे यांना राज ठाकरे यांनी ऑपन चॅलेंज दिले होते. मीरारोड येथे झालेल्या त्यांना राज ठाकरे यांनी थेट धमकीच दिली. 'दुबे तू आम्हाला पटक पटक के मारणार.. दुबेलाच सांगतो.. दुबे, तू मुंबईत ये...मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी दुबे यांना प्रत्युत्तर दिले होते. आता मराठी-हिंदी भाषेच्या वादात केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे यांनी उडी मारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनाच चॅलेंज केले आहे. '...तर राज ठाकरे यांनी मंचावरून हिंदी भाषिक जनतेची माफी मागावी.', असे विधान त्यांनी केले आहे.
सतीश दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भलीमोठी पोस्ट करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी त्यांना थेट चॅलेंज केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'राज ठाकरे जेव्हा व्यासपीठावर येतात, तेव्हा अचानक त्यांना मराठी धोक्यात वाटू लागते. हिंदी बोलणारा एखादा दुकानदार, रिक्षावाला किंवा प्रवासी दिसला, तर लगेच तो “महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर” हल्ला ठरतो. काय गमतीशीर विडंबना आहे ना… ज्या हिंदीवर त्यांना एवढा आक्षेप आहे, त्याच हिंदीत पत्रकार परिषद घेतल्या जातात, मुलाखती दिल्या जातात आणि Netflix वर एखादी वेब सीरिज बघायची झाली, तर सबटायटल्सही हिंदीतच असतात.'
सतीश दुबे यांनी राज ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शितात या मुद्द्यावरून देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असे लिहिले की, 'आता एक नजर त्यांच्या कुटुंबाकडेही टाकूया. मुलगा इंग्लिश मिडियम शाळेत शिकत होता.पण सार्वजनिक मंचावर आले की लगेच “मराठी अस्मिता” ची चादर ओढली जाते. असे का? कारण खऱ्या प्रश्नांवर बोलणं कठीण असतं. रोजगार, आरोग्य, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षण व्यवस्था. यावर बोलण्यासाठी अभ्यास हवा असतो, जमिनीवर काम पाहिजे, आणि जरा जबाबदारीही. आणि ज्यांना भाषणाच्या नावाखाली फक्त गोंगाट करता येतो, त्यांच्यासाठी “भाषा” हेच सर्वात सोपं लक्ष्य. कारण भाषा बोलत नाही, ती प्रश्न विचारत नाही.'
सतीश दुबे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुढे लिहिले की, 'उध्दव ठाकरे यांची राजकारणाची दिशा आता इतकी वाहती झाली आहे की पुढचे वळण कुठे असेल हे सांगणं अवघड झालंय. कधी शिवसेनेचा हिंदुत्वाचा झेंडा, कधी राहुल गांधींसोबत सेक्युलर कवच, कधी बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणं आणि कधी त्याच बाळासाहेबांच्या विचारांना दुर्लक्षित करणं. राजकारणात मतं बदलणं चूक नाही, पण वारंवार आत्माच बदलणं संशयास्पद नक्कीच ठरतं.'
सतीश दुबे यांनी राज ठाकरेंच्या मराठी अस्मितेवर देखील आक्षेप घेतला आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'आणि हो, जे गुंड पूर्वी रस्त्यावर हिंदी बोर्ड फाडत होते, ते आजही बेरोजगारच आहेत... कारण भाषा नोकरी देत नाही, सन्मानही देत नाही… तो मिळतो कामाने आणि विचारांनी. म्हणून राज ठाकरे साहेब, खरंच जर तुम्ही “महाराष्ट्राच्या अस्मितेचे” खरे रक्षक असाल, तर एक दिवस मंचावरून हिंदी भाषिक जनतेची माफी मागा.'
सतीश दुबे यांनी पुढे सांगितले की, 'ज्यांचा कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता, फक्त पोटाची भूक आणि रोजगाराची आस होती. आणि उध्दवजी, जर तुम्ही खरोखर बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवत असाल, तर ते “संदर्भानुसार” बदलणं थांबवा. कारण खरा नेता तोच असतो जो भाषांमध्ये भिंती उभ्या करत नाही, पूल बांधतो. मंचावर मराठीत बोलणं चांगली गोष्ट आहे, पण जमिनीवर माणुसकीची भाषा बोलणं त्याहून मोठी आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.