

काही आठवणी काळाच्या ओघात धूसर होतात, तर काही आठवणींची खूण वर्षानुवर्षे जमिनीच्या कुशीत दडून राहते असं म्हणतात. लग्नाच्या वेळी बोटात घातलेली एक अंगठी जी हरवल्यानंतर पुन्हा कधीच सापडणार नाही असं तिच्या मालकाला वाटलं होतं. परंतु तब्बल 83 वर्षांनंतर हीच हरवलेली अंगठी सापडलीये. आता तुम्ही म्हणाल हा एखाद्या एकाद्या सिनेमाचा सीन आहे. मात्र असं नाहीये. नेदरलँड्समध्ये घडलेली ही घटना काळजाला स्पर्श करणारी आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हरवलेली लग्नाची अंगठी तब्बल 83 वर्षांनंतर पुन्हा सापडल्याची घटना घडलीये. नेदरलँड्समधील एका शेतात ही अंगठी हरवली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका व्यक्तीला मेटल डिटेक्टरच्या मदतीने ही अंगठी सापडली. त्यानंतर त्याने ती अंगठी थेट मालकाच्या कुटुंबीयांकडे नेऊन दिली. इतक्या वर्षांनंतर वडिलांची आठवण असलेली ही अंगठी पुन्हा मिळाल्याने कुटुंबीय भावूक झालंय.
ही अंगठी जो नाबूर्स यांची होती. नेदरलँड्समधील ओडिलियापील गावात त्यांच्या कुटुंबाची शेती होती. 1942 किंवा 1943 च्या हिवाळ्यात शेतामागे धान्य मळणीचं काम सुरू असताना त्यांची अंगठी हरवली होती. त्यावेळी त्यांनी अंगठी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण ही अंगठी कुठेच सापडली नाही. जो नाबूर्स यांचं 1941 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर अवघ्या एक-दोन वर्षांतच त्यांची ही अंगठी हरवली होती. त्यानंतर अनेक वर्षे ही अंगठी जमिनीखालीच पडून होती. अखेर अंगठी परत मिळण्याआधीच जो नाबूर्स यांचं निधन झालं.
दरम्यान तब्बल आठ दशकांनंतर एका व्यक्तीला मेटल डिटेक्टरच्या मदतीने या भागात शोध घेताना ही अंगठी सापडली. नेदरलँड्समधील नॉर्थ ब्राबंट प्रांतातील ओडिलियापील गावात जमिनीपासून सुमारे 20 सेंटीमीटर खाली ही अंगठी होती.
ही अंगठी सापडल्याची माहिती जो नाबूर्स यांच्या जुन्या घराजवळ राहणाऱ्या एका नातेवाईकाला मिळाली. त्याने ही माहिती जो यांचा मुलगा बर्ट नाबूर्स यांना दिली. तसंच लवकरच एक व्यक्ती त्यांना भेटायला येणार असल्याचंही सांगितलं. यानंतर अंगठी शोधणाऱ्या व्यक्तीने स्वतः बर्ट यांची भेट घेतली आणि त्यांना अंगठी परत दिली. इतक्या वर्षांनंतर वडिलांची हरवलेली अंगठी पुन्हा समोर आल्याने बर्ट यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी अंगठी शोधून परत आणणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची तयारीही दाखवली. पण त्या व्यक्तीने पैशांचं बक्षीस घेण्यास नकार दिला.
बर्ट यांनी नेदरलँड्समधील DTV Nieuws या वृत्तवाहिनीला सांगितलं की, त्यांच्या वडिलांनी अंगठी हरवल्याची गोष्ट त्यांना अनेकदा सांगितली होती. पण बर्ट यांनी वडिलांच्या बोटात कधीही लग्नाची अंगठी पाहिली नव्हती. कारण त्यांना आठवतं त्या आधीच वडिलांची अंगठी हरवली होती. 'माझे वडील कधी कधी मला त्यांची अंगठी हरवल्याचं सांगायचे,' असं बर्ट यांनी डच न्यूज चॅनल NOS ला सांगितलं.
अंगठी नेमकी कोणाची आहे, हे ओळखण्यात कुटुंबीयांना फारसा वेळ लागला नाही. कारण, अंगठीच्या आतील बाजूला जो नाबूर्स आणि त्यांची पत्नी यांच्या लग्नाची तारीख कोरलेली होती. या तारखेवरून हीच ती 1941 मध्ये लग्नाच्या वेळी मिळालेली आणि शेतात हरवलेली अंगठी असल्याचं स्पष्ट झालं.
अंगठी पुन्हा मिळाल्याने बर्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला. त्यांच्या भाऊ-बहिणींना ही अंगठी परत मिळाल्याचा मोठा आनंद झाला. 'माझ्या भाऊ-बहिणींना अंगठी सापडल्याचा खूप आनंद झाला आहे,' असं बर्ट म्हणालंय.
83 वर्षे जमिनीखाली राहूनही अंगठी चांगल्या स्थितीत होती. अंगठीची अवस्था पाहून बर्ट यांनाही आश्चर्य वाटलं. ही अंगठी नेहमी कोरड्या जागी राहिली असावी त्यामुळे तिचं नुकसान झालं नसावं, असं त्यांनी सांगितलं.
जो नाबूर्स आज हयात नसल्याने त्यांना आपली हरवलेली अंगठी पुन्हा पाहता आली नाही. पण त्यांच्या मुलांसाठी ही अंगठी केवळ दागिना नाही तर आई-वडिलांच्या लग्नाची आणि वडिलांनी सांगितलेल्या जुन्या आठवणींची खूण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.